पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

याचा विचार येथवर केला. प्रथमतः त्यांनी हा सर्व समाज एकवंशीय आहे असा विचार मांडला. काही जमातींशी प्रत्यक्षच वैवाहिक संबंध जोडले. जेथे ते जमले नाही, तेथे अनेक ब्राह्मण व क्षत्रिय श्रेष्ठ पुरुषांच्या कुळांशी या जमातींचे सांस्कृतिक संबंध जोडून दिले. हे श्रेष्ठ पुरुष त्यांचे धर्मपिते वा गुरु वा नेत झाले. अनेक क्षत्रिय राजघराण्यांनी ज्याप्रमाणे आपले संबंध चंद्रसूयांशी जोडले त्याचप्रमाणे आर्यनेत्यांनी या जमातींचे धागे या पुरुषांशी जोडून दिले. हे करीत असतानाच त्यांनी यज्ञसंस्था व वेदग्रंथ यांच्याबद्दलच्या निष्ठा त्या जमातींत निर्माण केल्या. आणि सर्वाहून विशेष प्रभावी साधन म्हणजे संस्कृत भाषा ! आसेतुहिमाचल शास्त्रीपंडितांमध्ये या भाषेचा त्यांनी प्रसार करून सांस्कृतिक, धार्मिक व भावनात्मक ऐक्याचे अत्यंत चिवट असे बंध निर्माण केले. यामुळे अखिल भारत ही एक भूमी आहे आणि येथला सर्व लोक- समुदाय हा एक समाज आहे ही गोष्ट भारती युद्धाच्या पूर्वीच त्यांनी सिद्ध करून टाकली होती. त्यामुळे या युद्धात क्षत्रियांचा फार भयंकर संहार झाला तरी या भूमीची खंडे झाली नाहीत, फाळणी होण्याचे महादुर्दैव तिच्या कपाळी आले नाही आणि यदाकदाचित तसा संभव निर्माण झाला असलाच तर श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला अश्वमेध करण्याची प्रेरणा देऊन भारतात एक सार्वभौम सत्ता स्थापन करून मुळातच तो नष्ट करून टाकला. वेदकाळातील नेत्यांच्या प्रयत्नांचे हे स्वरूप पाहिल्यावर आता पुढल्या पुराणकाळाचा विचार करावयाचा आहे.

इतिहासपुराणे :

  वेदकाळानंतर पुराणकाळ येतो असे वर म्हटले आहे. त्याचे थोडे स्पष्टीकरण करणे अवश्य आहे. वेदकाळ साधारणपणे इ. पू. ४००० ते इ. पू. १००० असा धरला जातो. रामायण- महाभारत यांना इतिहास म्हणतात. त्यांत वर्णिलेल्या घडामोडी वर सांगितलेल्या वेदकाळात घडल्या हे खरे. पण ते ग्रंथ अर्वाचीन आहेत. त्यांचा काळ इ. पू. ३०० ते २०० असा मानतात. त्यानंतर पुराणे रचली गेली. ही अठरा पुराणे साधारणपणे इ. स. ३०० ते ८०० या काळात रचली असे मत रूढ आहे. याविषयी फार मतभेद आहेत. पण आपल्या विवेचनाच्या दृष्टीने ते अप्रस्तुत आहेत. पुराणांचा काळ वर सांगितला