पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज समाज आहे काय ?
१५
 

हे पुरुरवा- यदु याचे वंशज म्हणवितात. पण त्यांनी अनार्यांशी विपुल प्रमाणात विवाहसंबंध केले हे विशेष आहे. यामुळे परकीयांचे आर्यीकरण फार सुलभ झाले. यादवांचा वीर श्रीकृष्ण शिरोमणी हा अतिशय उदारमतवादी होता. त्याच्या तत्त्वोपदेशामुळे तथाकथित शुद्रसमाजात आर्यांच्या संस्कृतीचा प्रसार वेगाने झाला. यादवांच्या या उदार (म्हणजेच इतरांच्या दृष्टीने ढिल्या) धोरणामुळेच त्यांच्या काही शाखांना महाभारत व पुराणे यात असुर म्हणून संबोधिले आहे.
 ते कसेही असले तरी श्रीरामचंद्र व श्रीकृष्ण हे खरे आर्यवीर होत, 'कृण्वतो विश्वमार्यम्' या चळवळीचे ते आद्य आधारस्तंभ होत यात शंकाच नाही. त्यांची परमेश्वराच्या अवतारात गणना होते ती यासाठीच.' (दि वेदिक एज, पृ. ३१५).

यज्ञकर्ते असुर :

 श्रीकृष्णांनी स्वतः जांबुवती या आर्येतर जमातीतल्या राजाच्या कन्येशी विवाह केला होता. नरकासुराने पळवून नेलेल्या सहस्रावधी स्त्रिया मुक्त करून त्यांच्याशीही त्यांनी विवाह केला हे प्रसिद्धच आहे. त्यांचा नातू अनिरुद्ध याने बाणासुराच्या कन्येचे पाणिग्रहण केले होते. बाणासुर, जरासंध, शिशुपाल हे सर्व असुर म्हणून प्रसिद्ध आहेत. पण ते सर्व यज्ञकर्ते व ब्राह्मणी- संस्कृतीचे अभिमानी होते. श्रीकृष्ण जरासंधाच्या गिरिव्रज नामक नगरीला गेले तेव्हा प्रथम ते त्याच्या राजवाड्याच्या यज्ञशाळेतच गेले. नगरीतून जाताना त्यांना वेदमंत्रांचे घोष ऐकू येत होते. श्रीकृष्ण आले तेव्हा राजधानीत अशुभ चिन्हे होऊ लागली. ती तेथील वेदपारंगत ब्राह्मणांना प्रथम दिसून आली व त्यांनीच ती राजाच्या निदर्शनास आणिली. यावरून प्रारंभी सांगितलेल्या राक्षस, वानर, दैत्य, इ. जमातींत या काळापर्यंत वैदिक संस्कृतीचे व यज्ञसंस्थेचे मूळ चांगले खोलवर गेले होते असे दिसून येईल. आर्यसंकृतीच्या कक्षेत येऊनही काही जमातींनी रामकृष्णादी आर्यांशी वैरभाव धरला होता हे खरे पण तशी वैरे आर्याआर्यांतही होती. अखिल भारताचे आर्यीकरण करण्याच्या दृष्टीने असुरराजांची ही यज्ञभक्ती व वेदनिष्ठा लक्षणीय आहे.
 भारतवर्षामधील शेकडो जमातींना एका सूत्रात गुंफून त्यांच्यातून एकजीव समाज निर्माण करण्यासाठी वेदकालीन कर्त्या पुरुषांनी कोणते प्रयत्न केले