पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

सर्व श्रेय अखिल भारतात वेद व संस्कृत वाणी व यज्ञसंस्था यांचा प्रसार करणाऱ्या अगस्त्यप्रभृती ऋषींना व त्यांचे रक्षण करणाऱ्या श्रीराम-कृष्णांना आहे.

श्रीकृष्णांचे कार्य

 अखिल भारताचे एकराष्ट्र करण्याच्या दृष्टीने श्रीकृष्णांचे कार्य फार मोठे आहे. वेद, यज्ञसंस्था, संस्कृतवाणी व एकंदर आर्यसंस्कृती यांनी एकरूप झालेल्या समाजाला एकाच सार्वभौमसत्तेखाली आणून ती ऐक्यबंधने दृढ करून टाकण्याचे महाकार्यं त्यांनी केले. युधिष्ठिराने सार्वभौमसत्ता प्रस्थापित करावी अशी श्रीकृष्णांची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठीच प्रथम त्यांनी त्याच्याकडून राजसूय यज्ञ करविला आणि भारतीय युद्धानंतर अश्वमेध करवून पांडवांची सत्ता आसेतुहिमाचल प्रस्थापित केली. युधिष्ठिर हा अत्यंत नालायक निघाल्यामुळे कृष्णाचे मनोरथ ज्या प्रमाणात सिद्धीस जावयास हवे होते त्या प्रमाणात गेले नाहीत. युधिष्ठिराच्या अंगी कणखरपणा नव्हता, दृढनिश्चय नव्हता, तडफ नव्हती. मोठमोठी धर्मतत्त्वे बोलत राहण्याची फक्त त्याला सवय होती. पण त्यांचा अहर्निश जप करूनही द्यूत खेळू नये, राज्य व बायको पणाला लावू नये, प्रजापालन हा श्रेष्ठ धर्म होय हे काही त्याला उमगले नाही. इतका त्या व्यसनाच्या तो आहारी गेला होता. त्यामुळे भारतीय युद्ध त्याने ओढवून घेतले व श्रीकृष्णांचे मनोरथ धुळीस मिळविले. तरी त्या संहारानंतरही जमेल त्या रीतीने त्यांनी सार्वभौमसत्ता पांडवांकडून प्रस्थापित केलीच. अखिल समाज एकजीव करून टाकण्यास तिचे फारच साह्य झाले.
 श्रीकृष्ण यादवकुळातले होते. आणि या कुलाने आर्यसंस्कृतिप्रसाराच्या कामी फारच मोठे कार्य केले असे इतिहासवेत्त्यांचे मत आहे. भारतीय इतिहास समितीच्या 'हिस्टरी अँड कल्चर ऑफ दी इंडियन पीपल' या ग्रंथाच्या 'दि वेदिक एज' या पहिल्या खंडात डॉ. ए. डी. पुसाळकर म्हणतात, 'भारताचा नैर्ऋत्य भाग व रजपुताना, गुजराथ, माळवा व दक्षिणापथ या प्रांतांवर आपली अधिसत्ता प्रस्थापित करून तेथे आर्यसंस्कृतीचा ध्वज उभारण्याचे जे कार्य यादवांनी केले त्याचा विशेष उल्लेख करणे अवश्य आहे. हे प्रदेश यादवांच्यामुळेच आर्यसंस्कृतीच्या कक्षेत आले. यादव