पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

आपल्याला काडीमात्र यश येत नाही. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण आपल्याला करता येईल की नाही हा पूर्वीचाच प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे.
 याचे कारण हे की येथे लोकशाही प्रस्थापित झाली; पण तिचा भार पेलण्यास येथे 'लोक' अजून निर्माण झालेले नाहीत. येथला बहुजनसमाज, आपली कोट्यवधी जनता अजून जुन्या युगात आहे. राष्ट्र, विज्ञान, व्यक्तिस्वातंत्र्य, समाज हितबुद्धी, राजकीय प्रबुद्धता यांचे संस्कार तिच्यावर अजून झालेले नाहीत. हे झाले नाहीत तोपर्यंत या जनतेतून 'लोक' निर्माण होणार नाहीत. आज जनतेत राजकीय प्रबुद्धता आली आहे; पण ती फक्त एकाच दृष्टीने. तिला सर्वत्र निवडून यावयाचे आहे. समाजसेवा या धर्माची तिला ओळखच नाही. सर्व भारतात प्रत्येक नागरिकाचे आज एकच ध्येय आहे. निवडून येणे ! त्यामुळे हा सर्व समाज भ्रष्ट, चारित्र्यहीन झाला आहे. त्याग, सेवा, निष्ठा हे लांब राहिले, या समाजातून प्राथमिक कर्तव्यबुद्धीचाही लोप झाला आहे. अशा स्थितीत या समाजाचा प्रपंच यशस्वी होणार कसा ?

हिंदुसमाजाचे भवितव्य :
 तेव्हा भारतीय समाजातून लोक निर्माण करणे हे आज पहिले कार्य आहे. त्यासाठी वर सांगितलेल्या निष्ठांचे संस्कार भारतातील जनतेवर करणे अवश्य आहे आणि त्यासाठी लक्षलक्ष त्यागी, ध्येयवादी तरुणांची संघटना भारतात उभी झाली पाहिजे. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत, 'मला एक हजार तरुण संन्यासी मिळाले तर मी भारतात क्रांती करीन.' आज तेवढ्यानेही भागणार नाही. लक्षसंख्येने असे तरुण एकत्र येणे अवश्य आहे. पाश्चात्य तरुणांची त्यांच्या धर्मावर असीम निष्ठा आहे म्हणून महारण्यात, जंगलात, पहाडात, दऱ्याखोऱ्यांत ते जन्मभर जाऊन राहतात व सर्व आयुष्य जनतेच्या सेवेत घालवितात. हिंदुसमाजाला अशा निष्ठेने संपन्न असे लक्षावधी तरुण निर्माण करता आले तरच आपल्याला, लोकशाहीला, राष्ट्रसंरक्षणाला व धर्मरक्षणाला पुरेसे सामर्थ्य व कर्तृत्व प्राप्त करून घेता येईल. एरवी या समाजाला कसलेही भवितव्य नाही !