पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२५७
 


जिवंतपणाची कसोटी
 विश्वहिंदु परिषद् हे कार्य शिरावर घेईल काय ? वर सांगितलेल्या अंकल कॅमसारखा एक मनुष्य पाचशेपाचशे तरुण दरसाल तयार करू शकतो. मेथॉडिस्ट, बॅप्टिस्ट, क्वेकर, साल्व्हेशन आर्मी अशा प्रत्येक मिशनला असे ध्येयवादी, वाहून घेणारे शेकडो लोक मिळतात. विश्वहिंदुपरिषद अखिल हिंदूंची संस्था आहे. संख्येच्याच दृष्टीने पाहिले तर यात अशक्य असे काहीच नाही; पण गुणांच्या, निष्ठेच्या, ध्येयवादाच्या दृष्टीने ? रामायणकाळात उत्तरेतून दक्षिणेकडे भारद्वाज, अत्री, अगस्त्य असे अनेक तरुण गेले व तेथे महारण्यात आश्रम बांधून राहिले आणि राक्षस, दस्यू, दैत्य अशा रानटांच्या हल्ल्यांना तोंड देऊन त्यांनी विंध्याच्या दक्षिणेची सर्व जनता आर्यसंस्कृतीच्या कक्षेत आणली. ऐतिहासिक काळात बौद्धभिक्षू या भूमीतून लंका, ब्रहादेश, चीन, जपान या देशांत गेले व तेथे त्यांनी प्रचंड मानवसमूहांना आपल्या धर्माची दीक्षा दिली. शालिवाहन शकाच्या पहिल्या दहा शतकांत जावा, सुमात्रा, बोर्निओ, सयाम, मलाया या पूर्वेकडच्या प्रदेशात कौंडिण्यासारखे भारतीय पुरुष गेले आणि त्यांनी रामायण-महाभारत संस्कृतीत तेथला समाज समाविष्ट केला. आजचा प्रश्न त्या मानाने सोपा आहे. आपल्याला कोठे परदेशात जावयाचे नाही. दळवळणाची साधने विपुल आहेत. एक शतकभर राष्ट्र, विज्ञान, बुद्धिवाद यांच्या लहरी तरी पूर्वसूरींच्या कृपेने भारतभर प्रसृत झालेल्या आहेत. म्हणजे भूमी तयार आहे. आता सेवेच्या, धर्मनिष्ठेच्या बळावर हे नवे संस्कार बहुजनांत रुजविण्याचे कार्य शिल्लक आहे. यासाठीच त्या समाजात राहून त्याशी एकरूप होऊन ही धर्मक्रान्ती घडविणारे लक्षावधी तरुण हवे आहेत. विश्वहिंदुपरिषदेचे हे कार्य आहे असे मला वाटते. हिंदुसमाज जिवंत असला तर असे कार्यकर्ते मिळणे अवघड नाही. तसा तो आहे की नाही हेच आता ठरावयाचे आहे.

§