पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२५५
 

विल्यम कॅमेरॉन टाऊनसेंड, अंकल कॅम, यांनी सिद्ध केले आहे. ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया येथे संस्थेच्या शाखा आहेत. त्यांतून दरसाल पाचशे तरुणांना त्या शास्त्राचे शिक्षण दिले जाते. शिवाय नदीनाले पार होणे, टहाळे, गवत यांच्या झोपड्या बांधून त्यात रहाणे, होडगी तयार करणे, हिंसा, महासर्प यांपासून स्वसंरक्षण करणे, साथीच्या रोगांवर उपचार करणे, जंगलांतून मार्ग काढणे यांचेही शिक्षण त्यांना दिले जाते. कारण महारण्यात वन्य जमातींच्या सान्निध्यातच त्यांना राहावयाचे असते. असे शिक्षण घेऊन दरसाल पाचशे तरुण स्त्रीपुरुष बाहेर पडतात व वर निर्देशिलेल्या वनारण्यात जाऊन जन्मभर धर्मप्रसाराचे कार्य करितात. मिशनऱ्यांच्या कार्यामागे अशा त्यागी, ध्येयनिष्ठ, धर्मनिष्ठ तरुणांची पुण्याई उभी आहे. तेच त्यांचे खरे बळ, खरे सामर्थ्य आहे. हे बळ हिंदुसमाजाला निर्माण करता येईल काय, हा आजचा प्रश्न आहे. आर्यसमाज, रामकृष्ण मिशन, यांनी हे बळ काही प्रमाणात निर्माण केले आहे; पण वर सांगितल्याप्रमाणे ते अत्यल्प आहे, फार अपुरे आहे. सिंधूमध्ये एक मधुबिंदू इतकेच त्याचे प्रमाण आहे.

पुन्हा तोच प्रश्न :
 आज भारतात सर्व क्षेत्रांत पाहता आपले कर्तृत्व शून्यावर येऊन ठेपले आहे असे दिसते. आपल्या पंचवार्षिक योजना इष्ट फल देत नाहीत, कारखानदारी बुडीतखात्यात आहे, राजकीय मुत्सद्देगिरीच्या नावाने दिवाळे वाजले आहे, सर्वांना पुरेसे अन्न आपण निर्माण करू शकत नाही, विद्यालये, विद्यापीठे यांचा शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालावला आहे, आपल्या चलनाला स्थैर्य नाही, आपल्या नगरपालिका, महापालिका यांची कार्यक्षमता प्रसिद्धच आहे. सहकारी संस्था म्हणजे त्या शब्दाची विटंबनाच आहे, आपल्या पोलिसांना चोरटी आयात थांबविता येत नाही, खेड्यांत गुंडांचे राज्य प्रस्थापित होत आहे, तेथे त्यांचा कोणी प्रतिकार करू शकत नाही. आपल्याला आगगाड्या चालविता येत नाहीत, आपल्या इमारती बांधकाम पुरे होण्याच्या आधीच पडू लागतात, वीजपुरवठ्याची यंत्रणा आपल्याला साधत नाही, सीमाप्रश्न, पाणीवाटपाचा प्रश्न, कारखाने उभारण्याचा प्रश्न असे अंतर्गत प्रश्न रक्तपातावाचून आपल्याला सोडविता येत नाहीत आणि शेवटी आक्रमकांशी मुकाबला करून गेलेला प्रदेश सोडविण्यात