पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

पाची एखादी महासंस्था स्थापिल्यावाचून हे बल संघटित होणार नाही.

परंपरा नाही :
 पण या संस्थांतील सर्वात मोठे दौर्बल्य म्हणजे त्यांच्या परंपरा निर्माण होत नाहीत. हिंदुधर्मप्रसारक मंडळाचे ठाणे जिल्ह्यातील तळसारी येथे काम करणारे ल. र. कुळकर्णी यांनी एका पत्रात म्हटले आहे की, 'मला हार्टफेल झाल्यावर पुढे काय होईल याची चिंता वाटते.' हा प्रश्न एकट्या कुलकर्ण्याच्या पुढे नसून अखिल भारतापुढचा आणि गेल्या हजार वर्षांचा तो प्रश्न आहे. 'नेहरूंनंतर कोण ?' या स्वरूपात तो नुकताच पुन्हा सर्वांच्या मुखी झाला होता आणि नेहमीप्रमाणेच तो अनुत्तरितच राहिला आहे. समर्थ रामदासस्वामी गेले म्हणजे त्यांचे मठ चालू राहतात; पण त्यांना वारस निर्माण होत नाही. ते सामर्थ्यच या भूमीत नाही. पाश्चात्य देशांत परंपरा निर्माण करण्याचे सामर्थ्य प्रत्येक राष्ट्रात, प्रत्येक क्षेत्रात दिसून येते. विज्ञानसंशोधन, वैद्यकीय संशोधन, कारखानदारी, व्यापार, भूसंशोधन, लोकशाहीचे नेतृत्व, राजकीय मुत्सद्देगिरी, प्रशासन इ. सर्व क्षेत्रांत लिंकननंतर कोण, चर्चिलनंतर कोण, फोर्डनंतर कोण, एडिसन गेल्यावर काय हा प्रश्न तेथे निर्माण होत नाही. मिशनऱ्यांच्या परंपरा तर शेकडो वर्षे सतत चालतात; हेच त्या देशाचे बळ आहे. पण हे आपोआप निर्माण होत नाही. शाळा, प्रशाळा, महाशाळा यातून तसे संस्कार अहोरात्र, वर्षानुवर्षं केले जातात. पुण्यात 'स्पायसर' व 'डी नोबिली' अशा दोन ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या महाशाळा आहेत. त्यांतून बाराबारा वर्षे धर्मप्रवक्त्यांना शिक्षण दिले जाते आणि आमरण सेवेचे व ब्रह्मचर्याचे व्रत घेऊन तेथून अनेक मिशनरी दरसाल बाहेर पडतात आणि संस्था जगाच्या ज्या भागात पाठवील तेथे जाऊन तेथील दीनदलितांत मिसळून, त्यांच्या भाषा शिकून, त्यांशी एकरूप होऊन ख्रिस्ताचा संदेश त्यांच्यांत प्रसृत करतात. अमेरिकेतील 'समर इन्स्टिटयूट ऑफ लिंग्विस्टिक्स' ही संस्था ख्रिस्ती धर्माच्या प्रसारार्थच स्थापन झाली आहे. आफ्रिकेतील प्रचंड गहन अरण्ये, पेरू, ब्राझील या देशांतील जंगले यांत अजून लिहिता वाचता न येणारे कमीत कमी ७० कोटी लोक आहेत. ते एकंदर दोन हजार भाषा बोलतात. त्यांच्यात धर्मप्रसार करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी या रानटी जमातींच्या भाषा लिपिबद्ध कराण्याचे शास्त्र इन्स्टिट्यूटचे संस्थापक