पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

जनतेत रुजविण्याचे महान कार्य करतात.

विमोचित जमाती :
 'श्री गाडगेमहाराज मिशन' चे कार्य याच पद्धतीने चालू आहे. हे मिशन विमोचित जमातींच्या उद्धाराचे कार्य करते. ब्रिटिश राज्यकात्यांनी मांगगारुडी, ककाडी, वंजार, रामोशी, भामटा या जातींना गुन्हेगार ठरवून कैदखान्यासारख्या वसाहतींत त्यांना डांबून टाकले होते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने त्यांना मुक्त केले व त्यांच्या उन्नतीसाठी नानाविध योजना आखल्या. गाडगे- महाराज मिशन सरकारच्या साह्याने हेच कार्य करते. माण भागातील एक समाजसेवक यशवंतराव कृष्णराव माने यांनी गोंदवले येथे या जमातीसाठी प्रथम शाळा काढली. सातारा, ओतूर, राहुरी येथेही अशाच शाळा आहेत. या सर्व गुरुकुलपद्धतीने चालतात. त्यांना आश्रमशाळाच म्हणतात. तेथे अन्न, वस्त्र व शिक्षण मोफत पुरविले जाते.

धर्मनिर्णय मंडळ :
 लोणावळ्याचे 'धर्मनिर्णय मंडळ' याचे या क्षेत्रात विशेष महत्त्व आहे. त्याला एक स्वतंत्र स्थान आहे. गेली हजार वर्षे रूढ असलेले जे अधोगामी धर्मशास्त्र त्याची वेद, उपनिषदे, सूत्रग्रंथ, महाभारत, रामायण, स्मृती यांच्या आधारे चर्चा करून मंडळाने तो रूढधर्म कसा त्याज्य आहे आणि हिंदुधर्माचे सत्यस्वरूप काय आहे हे समाजाला दाखवून फार मोठे कार्य केले आहे. म. म. काणे, म. म. श्रीधरशास्त्री पाठक, विद्वद्-रत्न दप्तरी, वे. महादेवशास्त्री दिवेकर यांसारख्या थोर धर्मनिष्ठ पंडितांनी हे स्थापन केले असल्यामुळे मंडळाच्या या क्षेत्रातल्या अधिकाराबद्दल वाद होणे शक्य नाही. हे अर्वाचीनकाळचे ऋषीच होत. इ. स. १९३४ साली हे मंडळ स्थापन झाले तेव्हा 'तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषद्' असे त्याचे नाव होते. १९३८ साली 'धर्मनिर्णय मंडळ' असे नामांतर करण्यात आले. मंडळ बुद्धिवादी व परिवर्तनवादी असून जातीय ऐक्य, मिश्रविवाह, अस्पृश्यतानिवारण, यांचा ते पुरस्कार करते आणि सर्व हिंदूंना जातिपंथनिरपेक्ष वैदिक संस्कार करून समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे हे सध्याचे मंडळाचे कार्यवाहं असून