पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२५१
 

होय. परमार्थापासून प्रापंचिक कर्मे निराळी करणे अशक्य आहे. म्हणून खऱ्या पारमार्थिकांनी प्रपंचापासून वा जगापासून अलिप्त राहू नये. परमार्थास अवश्य ते गुण समाजसेवेतूनच निर्माण होत असतात. समाजालाच राष्ट्र ऊर्फ समष्टी म्हणतात. राष्ट्र नसते तर परमार्थपोषक गुण जन्मालाच येते ना, हे पारमार्थिकांनी कधीही विसरू नये. (भारतीय समष्टिधर्म, पृ. २४-२५) तेव्हा उच्चतम मानवी कल्याण हाच खरा धर्म होय. असा हा आमचा समष्टिधर्म बुद्धिनियंत्रित श्रद्धावादी व तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी आहे. हा धर्म पोथीनिष्ठ नाही. तत्त्वनिष्ठ पोथीवादी आहे. खरा धर्म व पोथी यांत विरोध आल्यास आम्ही पोथी फाडून टाकल्यावाचून राहणार नाही. (पृ. १८)
 जडाचा अतिरेक जसा वर्ज्य तसा अध्यात्माचाही अतिरेक आम्ही वर्ज्य मानतो. भौतिक शोधांचे आम्ही स्वागत करतो व त्या संशोधकांना भगवद्भक्तच मानतो. आम्हांस विज्ञानवादाचा संपूर्ण पुरस्कार करावयाचा आहे व समाज हितकारी नीतितत्त्वांचे समर्थन करावयाचे आहे. त्याचप्रमाणे धर्माच्या नावाखाली चाललेल्या पोथीनिष्ठ, अज्ञाननिष्ठ विषमतेचे निर्मूलन करावयाचे आहे. (पृ. १५३)
 आमच्या धर्मात, 'अवघे सम ब्रह्म पाहे, सर्वांभूती विठ्ठल आहे' अशी मानवी समतेची उदात्त तत्त्वे आहेत. पण या तत्त्वांचा आचार प्रत्यक्षात करावयाचा नसतो, असे रूढिवादी म्हणतात. ही चलाखीने काढलेली पळवाट आहे. ही समाजघातक प्रवृत्ती रूढींनी निर्माण केली आणि मदांध सत्ताधाऱ्यांनी तिला उचलून धरले. (पृ. १०१) वास्तविक नैसर्गिक व ईश्वरी कायदे सर्वाकरता समान आहेत. तेथे विषमता असलीच तर ती गुणभिन्नत्वाने असू शकते. पण गुणविकसनाचा अधिकार व संधी सर्वांना समान मिळावी असाच ईश्वरी हेतू आहे.
 पाचलेगावकरमहाराजांच्या समष्टिधर्माचे स्वरूप हे असे आहे. हा धर्म ते जन्मभर प्रत्यक्ष आचरणात आणीत आहेत. मिशनरी जसे दीन, दलित, अनाथ, परित्यक्त, रंजले, गांजले यांच्या जीवनांशी एकरूप होतात तसेच महाराजही भारतातील दीनदलितांशी एकरूप होतात. त्यांच्यांत राहतात, त्यांचेच अन्न खातात, श्रीमंत, श्रेष्ठवर्णीय यांना श्रमदानात सहभागी करून, किंवा महार, मांग, चांभार, भंगी, मराठे, ब्राह्मण अशा सर्व जातींच्या विद्यार्थ्यांसाठी एकत्र वसतिगृहे बांधून त्यांना दलितांशी एकरूप करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा रीतीने भारताला अत्यंत अवश्य असलेल्या समष्टिधर्माची तत्त्वे प्रत्यक्ष आचाराने