पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

नंतर ब्रिटिश हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळवून ते तेथून परत आले व शुद्धी, संघटन, समाजजागृती, समष्टिधर्माचा प्रचार या कार्याला त्यांनी प्रारंभ केला.
 महाराज आदर्श मिशनरी आहेत असे वर म्हटले आहे त्याचा अर्थ असा. मिशनरी वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून, लोकांना औषधोपचार करून त्यांचे रोगनिवारण करतात, त्यांना शिक्षण देतात व द्रव्यसाहाय्यही करतात. आणि या पुण्याईच्या बळावर धर्मप्रसार करतात. रोगनिवारणाची विद्या महाराजांच्याजवळ मिशनऱ्यापेक्षां शतपटीने जास्त प्रभावी आहे. त्या पुण्याईवर ग्रामीण भागात आज प्रचंड विधायक कार्य करून ते समष्टिधर्माचा प्रसार करीत आहेत. ते खेड्यांत जातात व श्रमदानमहोत्सव, श्रमदानसप्ताह, कृषिसेवा-यज्ञ, श्रमदान- महायज्ञ असे सहकारी श्रमयज्ञ घडवितात व विहिरी खोदणे, तलाव बांधणे, खते तयार करणे, सडका बांधणे, शाळा उभारणे, हजारो एकर जमीन सहकारी पद्धतीने कसणे, कातळावर तीनतीन फूट मातीचा थर टाकून नवीन जमीन तयार करणे, पडीक जमीन लागवडीस आणणे ही कामे खेडुतांकडून करून घेतात. आज भारताला हेच हवे आहे; पण हे घडविणारी ध्येयवादी माणसे नाहीत. या श्रमदानात सहकाराचे, उद्योगाचे, स्वावलंबनाचे, शास्त्रीय शेतीचे शिक्षण लोकांना मिळते. महाराज सरकारी अनुदाने घेत नाहीत. या श्रमदानात तीस तीस हजार लोक, कधी लाखापर्यंत लोक सहभागी होतात. त्यांच्या जेवणाखाणाची सोय भोवतालच्या परिसरातून खंडोगणती गहू, डाळ, तांदूळ, साखर हे पदार्थ जमवूनच केली जाते. यातून जनतेच्या मनावर जे संस्कार होतात ते फार मोलाचे आहेत. कारण या श्रमदानात जातिभेद नाही, अस्पृश्यता नाही, श्रीमंत-गरीब नाही, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन नाही. श्रमदानात सर्व सामील होतात. अनेक केंद्रमंत्री व राज्यमंत्री हा श्रमदानयज्ञ पाहावयास येतात. तेही खोरे घमेले घेऊन श्रमदानात सामील होतात. गुलझारीलाल नंदा, पाटसकर यांचे पाट्या घेतलेले फोटो त्या त्या वेळी प्रसिद्ध झालेलेच आहेत. असे श्रमदानयज्ञ महाराजांनी पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र, मद्रास, महाराष्ट्र, कर्नाटक- सर्व प्रदेशांत घडवून आणलेले आहेत आणि हे यज्ञ चालू असतानाच महाराजांची समष्टिधर्मांची प्रवचने चालू असतात. 'भारतीय समष्टिधर्म' या नावाने त्यांची प्रवचने प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांवरून त्यांच्या समष्टिधर्माचे स्वरूप पुढीलप्रमाणे दिसते.
 महाराज म्हणतात, ज्याने अभ्युदय व निःश्रेयस साधते तोच धर्म