पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२४९
 

असून आश्रमाचे कार्य चालविताना तिचाच त्यांनी अवलंब केला आहे. श्री. कुळकर्णी १९२४ सालापासून हिंदुत्वरक्षणाचे कार्य करीत आहेत. आज त्यांचे वय ७३ वर्षांचे आहे.

समष्टिधर्म-
 याच दिशेने, याच मार्गाने, याच मिशनरी पद्धतीने कार्य करणारे एक थोर पुरुष म्हणजे श्रीमंत पाचलेगावकर महाराज हे होत. महाराजांचे चरित्र व कार्य पाहिले म्हणजे दीनदलितांची सेवा करून त्यांच्यावर धर्मसंस्कार करण्याची जी मिशनरी पद्धती तिचे ते आदर्श आहेत असे वाटते. पाचलेगाव, जि. परभणी, मराठवाडा- निजामशाही येथे १९९२ साली महाराजांचा जन्म झाला. त्यांचे मूळचे नाव नरसिंह राजाराम कुळकर्णी. वाटेल त्या सापाचे विष उतरविणे व भूतबाधा, भानामती, चेटुक, मानसिक रोग, वेडेपण इ. व्याधींपासून लोकांना मुक्त करणे यासाठी आज ते प्रसिद्ध आहेत. ही विद्या त्यांना वयाच्या नवव्या वर्षापासूनच प्राप्त झालेली आहे. वडिलांनी लग्न ठरविल्याचे ऐकून ते त्याच वर्षी घरातून पळाले व तपःसाधना, भारताचा प्रवास यात काही वर्षे घालवून त्यांनी १२-१३ व्या वर्षीच समाजजागृतीच्या कार्यास प्रारंभ केला. प्रारंभी ते मोठमोठे यज्ञ घडवून आणीत. त्यांची मंत्रविद्या, निखाऱ्यांवरून पाय भाजू न देता लोकांना चालविण्याची विद्या, त्यांचे निर्भय अमोघ वक्तृत्व व वैराग्यवृत्ती यामुळे लोकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा बसली व हजारो लोक यज्ञसमारंभाला जमू लागले. याच वेळी महाराज लोकांना समष्टिधर्माचा उपदेश करीत. सध्याचा रूढ धर्म म्हणजे धर्माच्या नावाखाली चाललेला अधर्म आहे, असे त्यांचे मत आहे. प्राचीन हिंदुधर्म हा समष्टिधर्म होता, समाजधर्म होता, तो जाऊन उत्तरकाळात त्याच्या जागी व्यक्तिधर्म आला, त्यामुळे हिंदुस्थानचा अधःपात झाला, अशा तऱ्हेचे प्रतिपादन ते यज्ञप्रसंगीच्या प्रवचनात करीत.
 या प्रवचनांतून ते स्वातंत्र्याचा निःसंदेह पुरस्कार करीत व निजामी राज्यावरही कडक टीका करीत. प्रारंभी निजामाने दरमहा ८००रु. तनखा देऊ करून त्यांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला; पण महाराजांनी तो झिडकारून लावताच त्याने त्यांना हद्दपार केले. ब्रिटिश हद्दीतही पोलीस त्यांना राहू देईनात म्हणून काही दिवस फ्रेंच नागरिकत्व पतकरून ते पांदेचरीला राहिले होते; पण