पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

धर्मजागृती करून, प्रसंगी ख्रिस्ती मिशनरी व त्यांचे बाटे हस्तक यांच्या हिंसक आक्रमणाला तोंड देऊनही त्याला आळा घालण्याचे मोठे कार्य आश्रमाने चालविले आहे. मनाचे श्लोक, दासबोध, भक्तिसुधा, गीता इ. धार्मिक ग्रंथांच्या लाखो प्रती काढून आश्रमाने त्या विनामूल्य वाटल्या आहेत. धर्मशिक्षणाचा हा एक मोठा मार्ग आहे. शारीरिक शिक्षणाचे वर्गही आश्रम चालवितो आणि शुद्धिकृतांसाठी मारुतीची मंदिरे स्थापून या मार्गाने हिंदुसंघटना करतो. विनायक- महाराज मसूरकर यांच्या मागे ब्रह्मचारी दत्तमूर्ती यांनी आश्रमाचे काम तितक्याच जोमाने चालविले होते; पण मार्च १९६६ मध्ये ते ब्रह्मीभूत झाले. पण आश्रमाच्या कार्यात खंड पडलेला नाही. ब्रह्मचारी विश्वनाथजी यानी हिंदुसंघटनाचे कार्य मोठ्या धैर्याने व उत्साहाने तसेच चालविले आहे.

वारली पुरोहित :
 बोरिवली येथे १९६० साली 'हिंदुधर्मप्रसारक मंडळ' स्थापन झाले असून ते याच प्रकारचे कार्य करते. ठाणे जिल्ह्यातील डहाणू या गावापासून १० मैलांवर तळसारी हे गाव आहे. त्याच्याजवळ डोंगरपाडा येथे मंडळाने धर्मप्रसाराच्या हेतूनेच आश्रम स्थापिला आहे. ल. र. कुळकर्णी हे या मंडळाचे अध्यक्ष स्वतःच तेथे राहतात. या भागात प्रामुख्याने वारली लोकांची वस्ती आहे. शाळा, दवाखाने, सहकारी पेढ्या, उद्योग केंद्रे स्थापून त्या समाजाशी एकरूप होऊन कुळकर्णी व त्यांचे सहकारी धर्मप्रसार करतात. शुद्धिकार्यावरही त्यांचा भर आहेच. मधून मधून शंभरदोनशेच्या गटाने ते बाटलेल्या लोकांना स्वधर्मात परत आणतात. 'हिंदुधर्मपरिचय' या नावाची तीन पुस्तके श्री. कुळकर्णी यांनी लिहिली असून 'रूढ हिंदुधर्म हा धर्म नसून अधर्म आहे' असे मत त्यांनी मांडले आहे. जातिभेद, चातुर्वर्ण्य त्यांना मुळीच मान्य नाही. तळसारी विभागातील दोन वारली लोकांना याज्ञिकीचे शिक्षण देऊन त्यांनी त्यांना पुरोहित म्हणून मान्यता दिली व संकेश्वर मठाकडूनही त्यांना मान्यता मिळवून दिली. हा अधिकार ब्राह्मणांनाच आहे हे रूढ मत त्यांना अयुक्त वाटते. वारली तरुणांना तो अधिकार देऊन वैदिक समतेचेच त्यांनी पुनरुज्जीवन केले आहे. समाजाच्या उद्धारासाठी केवळ अध्यात्मविचार पुरेसा नाही. दीनदलितांच्या योगक्षेमाचा, अन्नवस्त्राचा प्रथम विचार केला पाहिजे, ही मिशनरी विचारसरणी त्यांना मान्य