पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२४७
 

नाही. ती उणीव भरून निघावी म्हणून या संस्थेने 'धर्मपरीक्षा' नावाच्या परीक्षा ठेविल्या आहेत. या परीक्षांत गीता, तुलसीरामायण, भगवान बुद्ध की वाणी, गुरुगोविंदसिंग की वाणी, जैनसिद्धान्त, मीरा, कबीर, सूरदास यांचे साहित्य यांवर प्रश्नपत्रिका असतात. विशारद, रत्न अशा पदव्याही यशस्वी विद्यार्थ्यांना दिल्या जातात. आजपर्यंत पाच लाख विद्यार्थी या परीक्षांना बसले आहेत. हृषीकेश येथे 'गीतारामायण- परीक्षासमिती' अशी समिती असून ती आज तेहतीस वर्षे हेच कार्य करीत आहे. कल्याण आश्रमातील विद्यार्थ्यांना या परीक्षांना बसविले जाते. मध्यप्रदेश सरकारने, ख्रिस्ती मिशनरी वाममार्गाने धर्मांतर घडवून आणतात, बाटलेल्या लोकांना राष्ट्रद्रोहाचे शिक्षण देतात, नागा- भूमीप्रमाणेच झारखंड ही दुसरी भूमी निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत, अशा तऱ्हेचे मिशनऱ्यांवर केले जाणारे जे आरोप त्यांची चौकशी करण्यासाठी 'नियोगी समिती' नेमली होती. तिच्यापुढे वरील आरोप सिद्ध करणारे अनेक पुरावे कल्याण आश्रमाने सादर केले. समितीने आश्रमाचे यासाठी स्वतंत्र पत्र पाठवून आभार मानले आहेत. धर्मो रक्षति रक्षितः । हे आश्रमाचे ब्रीदवाक्य आहे.

मसुराश्रम :
 महाराष्ट्रातील मसुराश्रम ही संस्था प्रसिद्धच आहे. धर्मभास्कर मसूरकर महाराज यांनी ती १९२० साली मसूर येथे स्थापन केली. गोव्यातील दहा हजार गावड्यांना त्यांनी शुद्ध करून स्वधर्मांत घेतले तेव्हा खिश्चन मिशनऱ्यांना मोठाच धक्का बसला. कारण त्यांच्या कार्याला हा मोठाच शह होता. तेव्हापासून आजपर्यंत आश्रमाने हजारो लोकांची शुद्धी केली आहे. आश्रमाचा विशेष असा की, शुद्धीनंतर शुद्धीकृतांचे विवाह जमवून आणण्याकडे चालक कटाक्षाने लक्ष देतात. 'जनपद विद्यापीठ' ही आश्रमाची एक अभिनव संस्था आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि मध्यप्रदेश, माळवा या भागांत आश्रम एकेक महिन्याचे हिंदुधर्मशिक्षणवर्ग चालवितो. या वर्गाला येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा जेवणाचा व राहण्याचा खर्च आश्रम करतो. बस्तर संस्थान, छत्तीसगड, सातपुडा, दमण- विभाग येथील वन्य जाती, गोंड, संताळ, कोर्कू, वारली, कोळी या जमाती यांच्यात ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य फार चालते. त्या लोकांत शिक्षणप्रसार करून,