पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज समाज आहे काय ?
१३
 

सुश्राव्य अशा संस्कृतात बोलू लागला. रामचंद्रांना ते भाषण ऐकून पराकाष्ठेचे आश्चर्य वाटले. ते लक्ष्मणाला म्हणाले-

नानृग्वेदविनीतस्य नायजुर्वेद धारिणः ।
नासामवेदविदुषः शक्यमेवं प्रभाषितुम् ॥
नूनं व्याकरणं कृत्स्नं अनेन बहुधा श्रुतम् ।
बहु व्याहरतानेन न किंचिदपश द्वितम्

- (किष्किंधा ३, ३०)

 'ज्याने ऋग्वेदाचा अभ्यास केलेला नाही, ज्याने यजुर्वेद धारण केलेला नाही, आणि जो सामवेद जाणत नाही, त्याला असे भाषण करता येणे शक्य नाही. खरोखर याने व्याकरणाचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे. कारण इतके दीर्घ भाषण करूनही याने एकही शब्द अशुद्ध उच्चारला नाही.'
 यावरून श्रीरामचंद्रांच्या आधीच दक्षिणेत संस्कृत भाषेचा प्रसार झाला होता हे उघड आहे. अखिल भारताची एकभूमी, त्याचे एकराष्ट्र घडविण्यात संस्कृत भाषेचे फारच मोठे साह्य झाले असले पाहिजे यात शंका नाही. पुढे पुराणकाली आसेतुहिमाचल प्रत्येक प्रदेशात पंडितवर्गाची हीच भाषा होती याला तर ऐतिहासिक प्रमाणेच आहेत. बहुजनांच्या अनेक प्राकृत भाषा त्या काळीही असल्या पाहिजेत. महाभारतात तसे वर्णनच आहे.

नानाचर्मराभिच्छन्ना । नानाभाषाश्च भारत
कुशला देशभाषासु । जल्पन्तोऽन्योन्यमीश्वराः ॥

कौरव-पांडव युद्धकाळी भारतातील सर्व प्रदेशातून राजे व सैनिक आले होते. त्यांचे हे वर्णन आहे. ते अनेक भाषी होते, आपापल्या देशभाषांत कुशल होते आणि त्यांतूनच बोलत होते. पण असे असूनही वरिष्ठवर्गाची, आर्यांची अखिल भारतातली विचारविनिमयाची, ग्रंथरचनेची भाषा संस्कृतच होती. भारतात असा एकही प्रदेश नाही की जेथले शास्त्रीपंडित संस्कृत जाणीत नाहीत. इंग्रजी राज्यात सर्व भारतात इंग्रजी भाषा पसरली म्हणूनच दक्षिणेतले टिळक, रानडे, गोखले, सत्यमूर्ती, सुब्रह्मण्यम् यांचे उत्तरेतील लजपतराय, विपिनचंद्र, मालवीय यांशी सामरस्य होऊन अखिल भारताचे एकराष्ट्र घडविणे सुलभ झाले. हेच कार्य पूर्वी संस्कृत भाषेने केले आहे. आणि त्याचे