पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

घाट घातला होता. अशाही स्थितीत 'महारवाडा हेच आमचे माहेरघर' असे महर्षी शिंदे म्हणत. प्राचीन ऋषींची हीच भावना होती. हिंदुसमाजाच्या मनोवृत्तीत कोणती क्रान्ती होणे अवश्य आहे ते विसाव्या शतकातील या ऋषींच्या चरित्रावरून कळून येईल.

कल्याण आश्रम :
 याच पद्धतीने कार्य करणारी सध्याची एक मोठी संस्था म्हणजे मध्यप्रदेशातील जशपूरनगर येथील 'कल्याण आश्रम' ही होय. जशपूरनगर हे रायगढ जिल्ह्यात असून रांचीपासून ११० मैलांवर आहे. या भागात सर्वत्र घनदाट जंगले असून त्यांत गोंड, मुंडिया, खैतिया, कोरवा इ. जमातींचे आदिवासी लोक राहतात. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आज पन्नास-साठ वर्षे या प्रदेशात ठाण मांडलेले असून लोकांचे दारिद्र्य, अज्ञान, कर्जबाजारीपणा आणि हिंदुसमाजाची उपेक्षा यांचा फायदा घेऊन त्यांनी आदिवासींना बाटविलेले आहे. हे सर्व हिंदुसमाजाच्या गतशतकांच्या घोर पापांचेच फल आहे; पण त्याचे क्षालन करावे अशी बुद्धी थोडी जागृत झाली असल्यामुळे कल्याण आश्रमासारख्या संस्था निघत आहेत. र. के. देशपांडे हे या आश्रमाचे प्रधान असून मो. ह. केतकर हे संचालक व भीमसेन चोरडा हे मंत्री आहेत. या वन्य प्रदेशात आश्रमाने शाळा, प्रशाळा, महाशाळा काढल्या असून दवाखाने, बँका व छात्रवास यांचीही स्थापना केली आहे. अगदी गरीब आदिवासींना अन्न, वस्त्र, शिक्षण व निवास सर्व मोफत पुरविले जाते. आश्रमाजवळ स्वतःची दोनशे एकर जमीन असून तेथे यांत्रिक पद्धतीने शेती केली जाते व त्या प्रकारचे सर्व शिक्षण आदिवासींना दिले जाते. सर्व शेती तेच करतात. आश्रमाच्या इमारती बांधणे, मंदिरे बांधणे, विहिरी खोदणे ही कामेही आश्रमीय विद्यार्थीच करतात. त्यांच्यापैकी काहींच्या कॉलेजच्या शिक्षणाचीही सोय आश्रमाने केली आहे. ह्या लोकांना भारताचे व नव्या आधुनिक जगाचे दर्शन घडावे म्हणून दिल्ली, काशी, गया, पाटणा या बाजूला सफरीही काढल्या जातात. हिंदुधर्माचे व संस्कृतीचे संस्कार त्यांच्यावर व्हावे म्हणून विजयादशमी, रामनवमी इ. उत्सव केले जातात. दिल्लीला 'अखिल भारतीय आर्य (हिंदु) धर्म सेवा संघ' अशी एक संस्था आहे. आज भारतात सरकारच्या निधर्मी धोरणामुळे विद्यालयांतून धर्मशिक्षण देण्याची सोय काहीच