पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२४५
 

त्यामुळे त्याच पद्धतीने त्यांनी आपले कार्य सुरू केले व चालविले. प्रथम त्यांनी मुंबईला परळ येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढल्यानंतर 'निराश्रित सेवासदन' स्थापून दीन, अस्पृश्य, बेवारशी, अनाथ यांना आश्रय देण्याची सोय केली. पुढे मग दवाखाने, वसतिगृहे, ग्रंथालये यांची स्थापना करून हिंदुसमाजाच्या या विकल अंगाला संस्कृतीच्या कक्षेत आणण्याचे महान कार्य त्यांनी हाती घेतले. महर्षी शिंदे यांना सरकारचे, धनिकांचे व चंदावरकर, भांडारकर यांच्यासारख्या थोर समाजनेत्यांचे चांगले साह्य झाले; पण त्यांना यापेक्षाही मोलाचे साह्य झाले ते त्यांची बहीण व त्यांचे मातापिता यांचे व या कार्याला सर्वस्वी वाहून घेणाऱ्या वामनराव सोहोनींसारख्या तरुणांचे. सर्वस्व वाहणारे लोक हेच खरे राष्ट्राचे बळ होय.
 महर्षीच्या भगिनी जनाक्का या आपली शिक्षिकेची नोकरी सोडून त्यांच्याबरोबर अस्पृश्यांच्या वस्तीत जाऊन राहिल्या. इतकेच नव्हे तर अस्पृश्य, दलित, अनाथ, बेवारशी अशा सर्व मुलांचे त्यांनी अपत्यवत संगोपन केले. या निःस्वार्थी सेवेमुळेच मिशनच्या कार्याला पहिल्यापासून यश आले व मनमाड, इगतपुरी, इंदूर, अकोला, अमरावती, मंगरूळ, मद्रास इ. ठिकाणी मिशनचे आश्रम स्थापन करणे शक्य झाले.

महारवाडा हेच माहेरघर :
 हे कार्य करीत असताना अनंत प्रकारच्या अडचणींना या समाजसेवकांना तोंड द्यावे लागले. अशा तऱ्हेची सेवा ख्रिस्ती मिशनरीच फक्त करतात, हिंदू असे कार्य कधीच करणे शक्य नाही, अशी हिंदुसमाजाची खात्री असल्यामुळे डिप्रेस्ड क्लास मिशनच्या लोकांना अनेक अस्पृश्यांनी ते ख्रिस्ती आहेत व वाढविण्यासाठी आले आहेत असे समजून, आपल्या घरांतून हाकलून लावले. महार, मांग, चांभार यांच्यांत आपसांतही अस्पृश्यता असल्यामुळे एका जातीला हे सेवक शिवल्यानंतर दुसऱ्या जातीचे लोक त्यांना घरात येऊ देत नसत. मुलीला मुरळी म्हणून सोडण्याची रूढी महारांत आहे. ती रूढी निंद्य आहे, ती नष्ट केली पाहिजे असा प्रचार कर्मवीरांनी सुरू केला व काही मुरळ्यांची लग्नेही लावून दिली; पण यामुळे काही ठिकाणचे महार भयंकर चिडले. हा आपल्या धर्मावर (!) घाला आहे असे त्यांना वाटले व त्यांनी कर्मवीरांना मारण्याचाही