पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

या प्रकरणाचा व प्रबंधाचा समारोप करू.

लाखांची शुद्धी :
 'केरळ हिंदु मिशन' ही अशीच एक संस्था आहे. जुन्या त्रावणकोर संस्थानात १९३७ साली ही स्थापन झाली. त्रावणकोरचे महाराज व दिवाण सर सी. पी. रामस्वामी अय्यर यांचा तिला पाठिंबा होता. त्यांनी मुक्त हस्ताने मिशनला द्रव्यसाह्य केले. अस्पृश्य, आदिवासी व दलित हिंदुसमाज यांतील हजारो लोकांना ख्रिस्ती मिशनऱ्यांनी बाटविले होते. त्यांना परत स्वधर्मात घेणे हा संस्थेचा मुख्य उद्देश. आजवर दोनतीन लाख लोकांना मिशनने शुद्ध केले आहे. स्वातंत्र्यापूर्वी धर्मांतरावर माणशी एक रुपया कर असे. स्वातंत्र्यानंतर स्वदेशी सरकारने तो आता ११| रु. केला आहे ! त्यामुळे मिशनच्या शुद्धिकार्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. तरी मिशनने जोमाने कार्य चालविले आहे. शाळा, देवालये, आयुर्वेदी दवाखाने चालवून धर्मांतराला आळा घालण्याचा मिशनने मोठा प्रयत्न चालविला आहे. सध्या मिशनचे तीनशे पगारी प्रचारक असून सहाशेवर स्वयंकार्यकर्ते आहेत. राजाश्रय संपल्यावर एवढा प्रचंड खर्च चालविणे मिशनला फार जड जात आहे; पण सध्याचे मिशनचे अध्यक्ष आर. वेलायुधन यांनी अत्यंत चिकाटीने कार्य चालविले आहे.

महर्षी शिंदे :
 'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी'- 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' या संस्थेच्या नावावरूनच तिचे स्वरूप ध्यानात येईल. महर्षी कर्मवीर विट्ठल रामजी शिंदे हे तिचे संस्थापक. अमेरिकेतील युनिटेरियन असोसिएशनचे एक प्रतिनिधी रे. डॉ. संडरलंड यांच्या भाषणामुळे प्रथम कर्मवीरांना धर्मसेवेची स्फूर्ती झाली. नंतर प्रार्थनासमाजातील उपासना ऐकून ते संस्कार दृढ झाले व त्या समाजाचे सभासद होऊन धर्मप्रसाराच्या कार्याला वाहून घेण्याचा त्यांनी निश्चय केला. वरील युनिटेरियन असोसिएशनकडून शिष्यवृत्ती मिळवून ते मँचेस्टरच्या कॉलेजमधून धर्मप्रसाराचे शिक्षणही घेऊन आले आणि परत आल्यानंतर प्रार्थनासमाजाच्या साह्याने त्यांनी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' या संस्थेची १९०६ साली स्थापना केली. मिशनऱ्यांच्या कार्यपद्धतीचा त्यांनी उत्तम अभ्यास केला होता.