पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२४३
 

शास्त्राला मान्य नव्हतेच; पण आश्चर्याची गोष्ट अशी की स्वामी विवेकानंदांच्या सहकाऱ्यांपैकी कित्येकांना हे मान्य नव्हते. धर्म हा मोक्षाचा, वैयक्तिक उन्नतीचा मार्ग होय, दीनदलितांची सेवा, समाजशिक्षण, समाजाची ऐहिक उन्नती, लोकांच्या योगक्षेमाची चिंता हे धर्मात येत नाही, असे त्यांना वाटे. त्यांनी स्वामींशी यावर अनेक वेळा वाद घातले. रामकृष्णांच्या शिकवणीच्या हे विरुद्ध आहे, असे ते म्हणू लागले; पण स्वामींच्या अलौकिक प्रभावामुळे त्यांचे मतपरिवर्तन होऊन त्यांच्या सर्वच्या सर्व म्हणजे सोळा सहकाऱ्यांनी संन्यासदीक्षा घेऊन मिशनकार्याला प्रारंभ केला.
 आज रामकृष्ण मिशनच्या शाखा सर्व भारतभर व अमेरिका, सीलोन, ब्रह्मदेश या अन्य देशांतही पसरल्या आहेत. दिल्ली, प्रयाग, कानपूर, मद्रास, नागपूर, मुंबई, कोइमतूर, म्हैसूर, विजगापट्टम- सर्वत्र आश्रमांचे जाळे विणलेले आहे. प्रत्येक ठिकाणी प्राथमिक शाळा, प्रशाळा, महाशाळा, औद्योगिक, वैद्यकीय अशी विद्यालये आश्रमाने स्थापलेली आहेत. रुग्णालये बांधलेली आहेत. मुलांसाठी, मुलींसाठी वसतिगृहे काढलेली आहेत. अनाथाश्रम आहेत, सेवाश्रम आहेत. दुष्काळ, पूर, धरणीकंप, साथीचे रोग या आपत्तींच्या वेळी समाजसेवा करण्यासाठी योजना नित्य सिद्ध आहेत आणि यांतून समाजसेवा करून मिशनचे संन्यासी धर्मप्रवचन करीत असतात. वेलूर येथे संस्थेचे मुख्य कार्यालय असून तेथून सर्वं कारभाराचे नियंत्रण होते. प्रारंभी मिशनजवळ थोडेच सन्यासी होते, आज साधारण साडेपाचशे आहेत. मिशनच्या सर्व संस्था हे संन्यासी चालवितात.
 मिशनची स्थापना केल्यावर स्वामीजी ४-५ वर्षांतच इहलोक सोडून गेले; पण सुदैवाची गोष्ट अशी की, त्यांची परंपरा चालविणारे कर्ते पुरुष मिशनला लाभले. स्वामी ब्रह्मानंद, प्रेमानंद, शारदानंद, अभेदानंद, शिवानंद, अखंडानंद यांनी कार्याची धुरा अंगावर घेतली. आज सत्तर वर्षे स्वामीजींच्या समाजनिष्ठ वेदान्तधर्मांचा प्रसार ते भारतभर करीत आहेत.
 आर्यसमाज व रामकृष्ण मिशन यांच्यानंतर धर्मजागृतीचे एवढ्या प्रचंड प्रमाणावर कार्य करणारी अखिल भारतव्यापी अशी संस्था निर्माण झाली नाही. पण लहान प्रमाणावर, प्रांतीय पातळीवर, मिशनरी पद्धतीने कार्य करणाऱ्या अनेक संस्था भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांत स्थापन झाल्या असून त्या हिंदुसमाज संघटनेचे कार्य करीत आहेत. त्यांच्यापैकी काहींची माहिती देऊन शेवटी