पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

रात तो मुळीच येत नाही. व्यवहारात त्याला अत्यंत विकृत रूप आले आहे. विषमता, शब्दप्रामाण्य, जन्मनिष्ठ जातिभेद, अस्पृश्यता, निवृत्ती ही आपल्या अधःपाताची कारणे आहेत. हिंदुसमाजात मानवाचे समूहच्या समूह गुलामगिरीत असल्यामुळे तो मृतवत झाला आहे. तेव्हा आता या समाजाचा उत्कर्ष साधावयाचा असेल तर आपल्या प्राचीन धर्मांचे पुनरुज्जीवन केले पाहिजे. सर्व समाजाला समता, स्वातंत्र्य, प्रवृत्ती, कर्मयोग यांचे शिक्षण देऊन दीनदलितांचा, अनाथअपंगांचा, उद्धार केला पाहिजे. ज्या समाजात विधवांचे अश्रू पुसले जात नाहीत, भुकेल्यांना अन्न दिले जात नाही, हीनांना उन्नत होण्याला अवसर नाही तो धर्महीन समाज होय. एक जात, एक वेद व सर्व समाजात सौहार्द हे खरे सत्ययुगाचे, धर्मांचे लक्षण होय. अशा धर्मांचे शिक्षण समाजाला, बहुजनांना देणे हाच भारताच्या उन्नतीचा खरा मार्ग होय. (हिस्टरी ऑफ दि रामकृष्ण मठ अँड मिशन-स्वामी गंभीरानंद, पृ. ७५, १०१-११२).

नवे संन्यासी :
 हे शिक्षण देणे हे सामान्य शिक्षकांचे काम नाही. ध्येयवादी, त्यागी, या कार्याला तनमनधन अर्पण करणारे संन्यासीच हे कार्य करू शकतील अशी स्वामींची निश्चिती होती आणि त्यासाठीच त्यांनी 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना केली. असे तरुण, विद्याविभूषित संन्यासी धर्मप्रवक्ते तयार करून सर्व भारतात व अन्य देशांतही त्यांना पाठवावयाचे, हे मिशनचे मुख्य काम. मात्र हे संन्यासी जुन्या संन्याशांहून अगदी भिन्न असले पाहिजेत. सर्वत्र दारिद्र्य, अज्ञान, अवकळा, गुलामगिरी यांचे थैमान चालू असताना ते जुने संन्यासपंथी लोक समाजाला अध्यात्म, संसाराची असारता, मायावाद यांचा उपदेश करीत हिंडत. स्वामींच्या मते हा केवळ मूर्खपणा होय. रामकृष्ण आश्रमाचे संन्यासी पूर्ण पाश्चात्य वृत्तीचे पण तितकेच हिंदुत्वनिष्ठ असले पाहिजेत, असे स्वामींचे सांगणे होते. खेड्यापाड्यांत जाऊन समाजात मिसळून नकाशे, मॅजिक लँटर्न, ग्रंथ यांच्या साह्याने त्यांनी ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत खऱ्या धर्माचे शिक्षण दिले पाहिजे. म्हणजे हे संन्यासी नव्या क्रान्तीचे नेते झाले पाहिजेत. असे संन्यासी तयार करणे हे रामकृष्ण मिशनचे मुख्य उद्दिष्ट होते.
 धर्म आणि समाजसेवा यांचा संबंध आहे, हे गेली हजारो वर्षे हिंदुधर्म