पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२४१
 

सर्व धर्मग्रंथ ते त्याज्य मानीत. समाज एकेश्वरी पंथाचा असून मूर्तिपूजेला त्यांचा विरोध आहे. यावरून निवृत्ती, व्यक्तिधर्म, जातिभेद, चातुर्वर्ण्य अस्पृश्यता हेच खरे हिंदुसमाजाचे रोग आहेत, आणि भारताच्या उन्नतीसाठी त्यांचा नायनाट केला पाहिजे, अशी स्वामींची निश्चिती होती हे स्पष्ट दिसते.
 हे कार्य साधण्यासाठी आर्यसमाजाने हरिद्वारला गुरुकुल व लाहोरला दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज अशा दोन संस्था स्थापून तेथे अनेक तरुण धर्मप्रचारकांना शिक्षण दिले व नंतर पंजाब व उत्तर प्रदेश मिळून धर्मप्रसारकार्यासाठी तीनशे शाखा स्थापन केल्या. या सर्व शाखांतून लोकसेवेतून धर्मप्रसार करण्याचे मिशनऱ्यांचे धोरणच अवलंबिलेले होते. अनाथांना आश्रय देणे, त्यांच्या योगक्षेमाची व्यवस्था करणे व त्यांना शिक्षण देऊन समाजात सुप्रतिष्ठित करणे हे कार्य आर्यसमाजाचे 'आर्य' मोठ्या निष्ठेने करतात. पतितांची शुद्धी हे तर समाजाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य होय. हिंदुधर्मातून पतित झालेल्यांना तर समाज शुद्ध करून घेतोच पण मूळच्या इतर धर्माच्या लोकांनाही तो हिंदुधर्माची दीक्षा देतो. मलकाना रजपुतांना स्वामी श्रद्धानंदांनी प्रचंड संख्येने शुद्ध करून घेतले म्हणून तर त्यांना प्राणांस मुकावे लागले. अर्थात त्यामुळे समाजाने आपले धोरण सोडले असे नाही. धर्मासाठी आत्मबलिदान करण्यासही तयार असणारे तरुण 'आर्य' हेच तर समाजाचे मुख्य सामर्थ्य आहे. कोणत्याही संस्थेचे, समाजाचे वा राष्ट्राचे हेच खरे सामर्थ्य होय. (महाराष्ट्रीय ज्ञानकोश.) त्यावरच त्याचे भवितव्य अवलंबून असते.

रामकृष्ण मिशन :
 हिंदुसमाजाच्या पुनर्घटनेसाठी, संघटनेसाठी अशा स्वरूपाचे सामर्थ्य निर्माण करणारी दुसरी मोठी संस्था म्हणजे 'रामकृष्ण मिशन' ही होय. १ मे १८९७ रोजी स्वामी विवेकानंदांनी हिची स्थापना केली. या संस्थेचा हेतू काय, तिचे स्वरूप व कार्यपद्धती काय असावी हे स्वामींनी अमेरिकेत असतानाच आपल्या सहकाऱ्यांना अनेक पत्रे लिहून स्पष्ट केले होते. स्वामींच्या मते हिंदुसमाजाची अस्मिताच नष्ट झालेली आहे. ती पुन्हा उज्जीवित केली पाहिजे; त्याचप्रमाणे या समाजात व्यक्तीला प्रतिष्ठा नाही म्हणून त्याचा अधःपात झाला आहे; असे त्यांचे निश्चित मत होते. ते म्हणतात की, आपला धर्म श्रेष्ठ आहे, पण व्यवहा