पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

दिवंगत झालेल्या त्यांच्या कन्या इडा स्कडर- यांचे होते. ज्यांना हिंदुसमाज- संघटना करावयाची आहे, त्यांनी या थोर ध्येयवादी मिशनऱ्यांच्या चरित्रांचा अभ्यास अवश्य करावा. गेल्या शतकात पाश्चात्य भौतिक शास्त्रज्ञ व मिल, स्पेन्सर यांसारख्या बुद्धिवादी पंडितांकडून ज्याप्रमाणे आपल्या नेत्यांना स्फूर्ती मिळाली त्याचप्रमाणे आपल्या धर्मसुधारकांनाही पाश्चात्त्य मिशनऱ्यांचे आदर्श पाहूनच कार्याची प्रेरणा झाली व त्यांनी तशी हिंदुसमाजाची सेवा करण्यासाठी संस्था स्थापल्या. पुढे तशा काही संस्थांची माहिती देतो. त्यांचा अभ्यास धर्मसंघटकांनी अधिकच आस्थेने केला पाहिजे. कारण आपली खरी स्फूर्तिस्थाने ती आहेत. आज भारतात गरज आहे ती तशा संस्थांची व त्यांनी निर्माण केलेल्या त्यागी, ध्येयवादी धर्मप्रवक्त्यांची. मोठीमोठी विद्यालये, आश्रम, मठ स्थापून विश्वहिंदुपरिषदेने बाराबारा वर्षे शिक्षण देऊन, असे लोकांत जन्मभर जाऊन राहणारे धर्मप्रवक्ते तयार केले तरच हिंदुसमाजाची संघटना करण्यात तिल यश येईल.

आर्यसमाज :
 ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या पद्धतीने हिंदुधर्माचा प्रसार करणारी भारतातील पहिली मोठी संस्था म्हणजे 'आर्यसमाज' ही होय. स्वामी दयानंद सरस्वती हे तिचे संस्थापक होत. स्वामी मूळचे सौराष्ट्रातील असून त्यांनी समाजाची स्थापना १८७५ साली मुंबईस केली; पण समाजाच्या कार्याचा खरा प्रसार झाला तो पंजाबात. स्वामीजी खरे धर्मक्रांतिकारक होते. पूर्वीच्या लेखांतून वर्णिलेली हिंदुधर्मातील घातकी तत्त्वे आणि तज्जन्य दुष्ट रूढी यांचे निर्मूलन करावयाचे असा त्यांचा दृढ निश्चय झाला होता. धार्मिक, सामाजिक, राजकीय व शास्त्रीय बाबतीत हिंदुस्थानची उन्नती घडविणे हाच समाजस्थापनेत त्यांचा हेतू होता. समाज जन्मनिष्ठ जातिभेद वा वर्णभेद आणि अस्पृश्यता मानीत नाही. स्त्री व पुरुष यांचा सामाजिक दर्जा समाजाच्या मते सारखाच आहे. समाजातील सर्व सभासद परस्परांत रोटीव्यवहार व बेटीव्यवहार करतात, तसे विवाह घडवून आणण्याचा प्रयत्न असतो. वैयक्तिक मोक्ष हे व्यक्तीचे अंतिम उद्दिष्ट असू नये, समाजसेवा, समाजोत्कर्ष यांतच व्यक्तीचे हित आहे, असे स्वामी सांगत असत. वेद हा एकच धर्मग्रंथ त्यांना मान्य असून उत्तरकाळचे