पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२३९
 


गावाचे मातापिता :
 कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया परगण्यात व्हँकुव्हर नावाचे लहानसे बेट आहे. तेथे बहुसंख्य वस्ती रेड इंडियन लोकांची आहे. डॉ. जॉर्ज डार्वी यांनी टोरँटोला वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर मेथॉडिस्ट पंथात प्रवेश केला. पंथाने त्यांना या बेटातील वेलावेला या गावी पाठविले. ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी व्हँकुव्हरमधील लोक रानटी अवस्थेतच होते. ग्रामीण वैदू हेच तेथले डॉक्टर. औषधे, इंजेक्शने, शस्त्रक्रिया हे सर्व अशुभ, त्यांनी मरीआई कोपते अशी त्यांची श्रद्धा. नव्या डॉक्टराकडून रोगी दगावला तर ते त्याला मारायला उठणार. अशा या परगण्यात पन्नास वर्षांपूर्वी आपल्या तरुण पत्नीला घेऊन डॉ. डार्वी आले व थोड्याच काळात गावाचे मातापिता झाले. वेलावेला गावचे धर्मगुरू तेच, डॉक्टर तेच, न्यायाधीश, पंच तेच, मित्र, सल्लागार सर्व तेच. या पन्नास वर्षाच्या अवधीत त्यांच्या वैद्यकीय नैपुण्यामुळे त्यांना पाचपट पगारावर अनेक ठिकाणी बोलावणी आली होती; पण ते गेले नाहीत. 'हेच माझे घर, येथेच माझे कार्य' असे ते दर वेळी सांगत. त्यांची स्वतःची मुले मोठी झाल्यावर त्यांच्या शिक्षणासाठी सौ. एडना डार्बी यांना त्यांना घेऊन व्हँकुव्हर शहरी जावे लागले. डॉ. डार्बी यांचे आता वय झाले होते, तरी त्यांनी कुटुंबवियोग पतकरला पण सेवात्रत सोडले नाही. पन्नास वर्षे तेथे राहून त्यांनी दुष्ट रूढी, अंधश्रद्धा, दारिद्य, रोग यांशी लढा केला व तो परगणा सतराव्या शतकातून विसाव्या शतकात आणला.

स्वकीय स्फूर्तिस्थाने :
 ही उदाहरणे गेल्या तीस-चाळीस वर्षांतली, पन्नास वर्षांतली आहेत. या सध्याच्या विज्ञानप्रधान जडयुगातही मिशनऱ्यांची धर्मश्रद्धा पूर्वीइतकीच दृढ आहे हे यावरून दिसेल. भारताच्या गेल्या शतकाच्या अखेरच्या नेत्यांपुढे आदर्श होते ते आफ्रिकेत धर्मप्रसारार्थ गेलेले स्टॅनले व लिव्हिंगस्टन, क्वेकर- पथाचे जॉर्ज फॉक्स, एलिझाबेथ फ्राय, साल्व्हेशन आर्मीचे विल्यम बूथ व त्यांची कन्या इव्हँजेलाइन बूथ, हवाई बेटांतील मोलोकाई येथे महारोग्यांची शुश्रूषा करण्यात आयुष्य घालविणारे फादर डामियन, हिंदुस्थानात आलेले झेव्हियर, स्टीफन्स हे जेसुइट, मद्रास प्रांतात काम करणारे जॉन स्कडर व नुकत्याच