पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

चळवळीला विरोध होता. कारण कामगार, शेतकरी, कोळी यांना सुस्थिती प्राप्त झाली तर भांडवलदार, जमीनदार यांच्याविरुद्ध ते भडकत नाहीत ही त्यांना चिंता असते. त्यांनी या सहकारी पेढ्यांत स्वतः शिरून त्या मोडण्याचा प्रयत्न केला; पण तेथे त्यांचा मुखभंग झाला. कारण फादर डॅन यांनी प्रत्येक गावात निर्लोभ नेतृत्व निर्माण केले होते.

युनीस वीव्हर :
 डोना युनीस ही ब्राझीलमधील एका खेड्यातील नऊ वर्षांची मुलगी. त्या वेळी महारोग्यांची सर्वांना भयंकर भीती वाटे. रस्त्याने त्यांची माळका भीक मागत जाई तेव्हा रस्त्यावर शिळेपाके अन्न ठेवून लोक भराभर दारे लावून घेत. ती माळका गेल्यावर मग दारे उघडीत. १९१६ साली या नऊ वर्षांच्या मुलीने त्या माळकेत आपल्या शेजारच्या मैत्रिणीला पाहिले आणि तिला जबरदस्त धक्का बसला. त्याच क्षणी महारोगनिवारणार्थ आयुष्य वाहण्याचा तिने संकल्प केला. नवव्या वर्षी ! मोठी झाल्यावर ती मेथॉडिस्ट पंथात शिरली व डॉ. अँडरसन वीव्हर या मिशनऱ्याशी तिचा विवाह झाला. नंतर तिने आपल्या कार्याला प्रारंभ केला. तिचे मुख्य धोरण हे की, महारोग्यांच्या मुलांच्यासाठी घरे उभी करून त्यांना आईबापापासून दूर करावयाचे व अशा रीतीने त्या रोगाचा त्यांना संसर्गच होऊ द्यावयाचा नाही. महारोग हा आनुवंशिक रोग नाही हे तिने वैद्यकीय संशोधनाने सिद्ध करून दिले आणि अशा रीतीने महारोग्यांच्या पुढल्या पिढीला बालवयातच मुक्त करण्याची चळवळ सुरू केली. ब्राझीलचे अध्यक्ष, प्रांतोप्रांतीचे गव्हर्नर, महिलामंडळे यांच्यापुढे व्याख्याने देऊन युनीस वीव्हर यांनी जागृती केली. हे सर्व लोक पिढ्यान् पिढ्यांचे दैववादी होते. पण सौ. वीव्हर यांनी त्यांच्या ठायी उत्साह निर्माण केला. ते आता त्यांना डायनामोच म्हणतात. १९३५ साली महारोग्यांच्या मुलांचे पहिले घर उभे झाले. आज ब्राझीलमध्ये तशी १७० घरे आहेत आणि २०,००० मुले त्यांत राहतात. ही मुले त्या किळसवाण्या रोगापासून पूर्ण मुक्त असतात आणि त्यांच्या मुलांतही ही रोगबीजे दिसत नाहीत हे युनीस वीव्हर यांनी सिद्ध करून दिल्यामुळे आता त्या मुलांना समाजात सर्वत्र मुक्त प्रवेश मिळतो. त्यांचे विवाहही समाजात होतात.