पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२३७
 

तेथे क्रान्ती घडवून आणली. हा सर्व गाव कोळ्यांचा असून मच्छीमारी हा त्यांचा धंदा; पण ते सर्व सावकारी पाशांमुळे पिढ्यान् पिढ्या कर्जबाजारी होते. सावकारच व्यापारी होते. ते तेथील कॉड मासा सात पैशाला विकत घेत व शहरात सत्तर पैशाला विकीत. फादर जिमी यांनी वर्षभर कोळ्यांत राहून त्यांना ही सर्व आर्थिक यंत्रणा समजावून दिली आणि प्रथम दोन आणे वर्गणी ठेवून हळूहळू त्यांच्याकरवी सहकारी पेढी स्थापन केली. हळूहळू कोळी कर्जमुक्त झाले. स्वतः शहराशी व्यापार करू लागले व आता कॅनसो गावाचे मोठे संपन्न शहर झाले आहे. फादर जिमी यांनी, सहकारी पेढी स्थापन झाल्यानंतर, धर्मप्रवचनास प्रारंभ केला. प्रारंभी ती प्रवचने स्वावलंबन, सहकार, अन्यायाचा प्रतिकार, इहलोकीचे सुख यांवर होती. 'तुम्ही जडवादी आहात' अशी त्यांच्यावर कोणी टीका केली तर ते उत्तर देत की, 'स्वतः जीजसही रिकाम्या पोटावर प्रवचने करीत नसे.' आज मिशनरी कार्याचा नियमच झाला आहे. आपल्या लोकांच्या योग- क्षेमाची ते प्रथम चिंता वाहतात, त्यातून धर्मोपदेश करण्याचा हक्क निर्माण करतात आणि मग धर्मव्याख्यान करतात. सहकारी पेढ्या यशस्वी करण्यास नेता किती निर्लोभ, निःस्पृह व निर्मळ असावा लागतो याची आपल्याला सहज कल्पना येईल. भारतातील सहकारी पेढ्यांचे काय चालले आहे, याकडे एकदा नजर टाकल्यास निर्लोभ नेतृत्वाचे महत्त्व सहज ध्यानात येईल. मिशनरी असे नेते आहेत म्हणूनच ते समाजाला सहकार शिकवू शकतात व त्या पायावर धर्मनिष्ठा दृढ करतात. पेरू देशातील अँडीज पर्वताच्या कुशीत पूनो हे ३०-३५ हजार वस्तीचे गाव आहे. तेथे फादर डॅन यांनी याच मार्गाने आर्थिक व धार्मिक क्रान्ती घडविली. 'फादर डॅनस मनी मिरॅकल' म्हणूनच ती प्रसिद्ध आहे. 'जे लोक कर्जात बुडालेले आहेत, ज्यांना भाकरीची चिंता आहे त्यांना उच्च धर्मतत्त्व सांगण्यात अर्थ नाही' असे फादर डॅन नेहमी म्हणत. पूनो गाव अत्यंत दरिद्री होता. झोपडपट्टीतच सर्व लोक राहात. त्यांना सहकाराची कल्पनासुद्धा प्रथम मानवेना. कारण प्रारंभीचे भांडवल तरी कोठून आणावयाचे आणि ते संभाळील असा विश्वासू माणूस कोठून आणावयाचा ? तेथेही आण्या- दोन आण्यांच्या भांडवलापासूनच फादर डॅन यांनी प्रारंभ केला व विश्वस्त ते स्वतः झाले. आज पेरू देशात कमीत कमी दोनशे गावांत अशा पेढ्या स्थापन झाल्या असुन ती गावे समृद्ध झाली आहेत. कम्युनिस्टांचा प्रथमपासूनच या सहकार-