पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

असेल. पण श्रीरामचंद्र दक्षिणेत आले त्याच्यापूर्वी अनेक पिढ्या हे कार्य झाले होते यात शंका नाही. रामायणात त्याचे अगदी सविस्तर वर्णन आलेले आहे. श्रीरामचंद्र वनवासाला येण्यापूर्वीच दण्डकारण्यात शेकडो, हजारो, अक्षरशः हजारो ब्राह्मण येऊन आश्रम करून राहिले होते. व वेदाध्ययन करून, यज्ञकुंडे स्थापून अग्निपूजा करीत होते. तेथील राक्षसांना हे असह्य झाल्यामुळे ते आश्रमांवर नित्य धाड घालून त्या आश्रमांचा व ब्राह्मणांचा नाश करीत असत. अत्रि, शरभंग, सुतीक्ष्ण, अगस्त्य इ. ऋषींचे आश्रम तेथे होते. तेथे श्रीरामचंद्र गेल्यावर राक्षसांनी हजारो ब्राह्मणांना मारून टाकल्याच्या भीषण कथा ऋषींनी त्यांना सांगितल्या व आपले राक्षसांपासून रक्षण करण्याची त्यांना प्रार्थना केली. ते दक्षिणेत येऊन राहिले होते तरी रामचंद्रालाच आपला राजा मानीत होते. म्हणजे आर्यराज्याच्या विस्ताराची कल्पना त्यांच्या मनात निश्चित होती. राक्षसांनी एवढा विध्वंस केला, ब्राह्मणांचे हत्याकांड केले तरी त्यांनी आपली यज्ञ, वेद व वैदिक संस्कृती यांवरील निष्ठा लवमात्र ढळू दिली नव्हती. उलट हरप्रयत्नाने राक्षसांनाही ते वेदमंत्राची व यज्ञाची दीक्षा देत. रावण हा स्वतः यज्ञकर्ता व वेदवेत्ता होता. हनुमान लंकेत गेला त्या वेळी त्याला राक्षसांच्या घरांतून वेदमंत्रांचे घोष ऐकू आले. वालीला मारल्यानंतर सुग्रीवाला रामचंद्रांनी अभिषेक करविला तो ब्राह्मणांच्या हस्ते व वेदमंत्रांचा घोष करूनच करविला. रावणवधानंतर विभीषणाला त्यांनी अभिषेक केला तोही समंत्रकच केला. तेव्हा विश्व आर्य करून टाकणे या ध्येयासाठीच ब्राह्मणांचे व क्षत्रियांचे प्रयत्न चालले होते हे उघड आहे.

संस्कृत- अखिल भारतीय भाषा :

 पण यापेक्षा अगदी निर्णायक पुरावा म्हणजे संस्कृत भाषेचा. आर्य ऋषी व राजे जेथे जेथे गेले तेथे तेथे वेद, यज्ञसंस्था व संस्कृत भाषा ही त्रयी नेण्यास ते विसरले नाहीत. वानर, राक्षस, नाग, दैत्य या सर्वांना यज्ञदीक्षेबरोबरच ते संस्कृत भाषेचेही पाठ देत असत. रामायणात याचा एक उत्कृष्ट पुरावा आहे. श्रीरामचंद्र व लक्ष्मण ऋष्यमूक पर्वतावर गेले तेव्हा सुग्रीवाने हनुमानाला त्यांच्याकडे पाठविले. तेव्हा हनुमान त्यांच्याशी अस्खलित व