पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

स्वसमाजात, ख्रिस्ती देशांत जेव्हा असतात तेव्हा धर्मांतराचा प्रश्न उद्भवतच नाही. वर जे मेथॉडिस्ट, क्केकर इ. पंथ सांगितले त्यांनी प्रारंभी स्वदेशातील दलित समाजाची जी सेवा केली तिचे उद्दिष्ट धर्मांतर हे असणे शक्यच नव्हते. अनाथ, निराश्रित, दीन, दरिद्री, परित्यक्त, पतित, गुन्हेगार यांच्यात मिसळून त्यांच्यावर खऱ्या धर्माचे संस्कार करून त्यांना जीवनात पुन्हा सुप्रतिष्ठित करणे हे त्यांचे खरे कार्य होते आणि आहे.

शत्रूची विद्या :
 भारतातील मिशनरी हे हिंदुधर्माचे व भारतराष्ट्राचे शत्रू आहेत असे वर एके ठिकाणी सांगितले आहे. ते तसे आहेत याबद्दल शंका नाही; पण येथे आपण प्रामुख्याने विचार करीत आहोत तो स्वसमाजाच्या उद्धारार्थ मिशनऱ्यांनी भिन्नभिन्न ख्रिस्ती धर्मपंथांनी जे अलौकिक कार्य केले त्याचा व विशेषतः त्यांच्या कार्यपद्धतीचा. लो. टिळक, स्वामी विवेकानंद यांनी त्यांचा आदर्श पुढे ठेवण्यास सांगितले ते या दृष्टीने. तरुणपणीच धर्मसेवेची दीक्षा घेऊन, आमरण ब्रह्मचर्य पाळून किंवा संसारातील दारिद्र्य पतकरून, अत्यंत निष्ठेने, प्रसंगी प्राणार्पणाचीही सिद्धता ठेवून अनाथ, अपंग, दीन, दलित यांची सेवा करण्याचे व्रत चालविणे ही सामान्य गोष्ट नाही. भारतात येणारे मिशनरी आपल्याला शत्रुसम असले तरी त्यांच्या या त्यागवृत्तीचा अभ्यास आपण केला पाहिजे. विष्णुशास्त्री चिपळूणकर हे इंग्रजांचे पक्के द्वेष्ठे, हाडवैरी; पण राष्ट्रनिष्ठा आपण त्यांना गुरू करूनच शिकली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याच न्यायाने आपण धर्मसंघटना करताना मिशनऱ्यांना गुरू केले पाहिजे. नागाप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश यांतील गहन अरण्यांत, सर्व अर्वाचीन सुखसोयींचा त्याग करून अगदी रानटी अशा परक्या जमातीत पन्नास पन्नास वर्षे राहून त्यांच्यांत धर्मप्रसार करणे यासाठी केवढी धर्मनिष्ठा, केवढे राष्ट्रप्रेम, केवढा मनोनिग्रह, केवढी त्यागबुद्धी अवश्य आहे याचा प्रत्येक भारतीयाने विचार केला पाहिजे ! असो. स्वसमाजात मिशनरी कसे कार्य करतात याची काही उदाहरणे देतो म्हणजे ही कल्पना स्पष्ट होईल.

फादर जिमी :
 नोव्हास्कोशियामधील कॅनसो या गावी १९२० च्या सुमारास रेव्ह. रॉ. जेम्स टॉमकिन्स- तथा फादर जिमी- हे धर्मगुरू म्हणून गेले व दहा-पंधरा वर्षांत त्यांनी