पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२३५
 

व्रत घेतले आणि त्यांच्यात राहून, त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांच्या मनावर खऱ्या धर्माचे, समतेचे, बुद्धिप्रामाण्याचे संस्कार केले व त्यांना अन्यायाच्या प्रतिकाराचे शिक्षण देऊन, त्यांच्यात चैतन्य निर्माण करून त्यांना पुन्हा जीवनात सुप्रतिष्ठित केले. त्यांच्या जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली व त्यांना राष्ट्राचे खरे नागरिक बनविले. हे कार्य त्यांनी केले नसते तर युरोपची प्रगती झाली नसती, तेथे राष्ट्रवाद, लोकसत्ता यांना यश आले नसते. ज्या देशात बहुसंख्य समाज दीनदलित आहे, दारिद्र्याने गांजलेला आहे, मुकाट्याने अन्याय सहन करतो आहे, अंधरूढींनी ग्रस्त आहे, तेथे कसले राष्ट्र नी कसली लोकसत्ता !
 हिंदुस्थानात हिंदुसमाजाची अशी स्थिती आहे. गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांत पालट झाला, परिवर्तन झाले ते अल्पसंख्य सुशिक्षितांत झाले. त्यांनी ते लोण समाजाच्या सीमेपर्यंत पोचविले नाही तर हिंदुसमाज संघटित होणार नाही आणि हे कार्य मिशनरी पद्धतीने केले पाहिजे.

मिशनरी कार्यपद्धती :
 लोकसेवेतून धर्मप्रसार हे मिशनऱ्यांचे प्रधान लक्षण आहे. औषध हे बायबलचे वाहन आहे, असे मिशनरी म्हणतात. ते जेथे जातात तेथे शाळा व दवाखाने उघडतात, शक्य तर रुग्णालयेही उभी करतात आणि या सेवेमुळे लोकांची त्यांच्यावर भक्ती जडल्यावर ते प्रथम धर्मोपदेश व नंतर धर्मांतर घडवितात. आज शेकडो वर्षे त्यांनी या मार्गाचा अवलंब केला आहे. आता अलीकडे त्यांनी एक नवीन उपक्रम आरंभिला आहे. ते ज्या परगण्यात जातील. तेथल्या लोकांच्या योगक्षेमाची, ऐहिक उत्कर्षाची चिंता ते वाहतात आणि त्यासाठी सहकारी तत्त्वावर समित्या स्थापन करून गावच्या लोकांना स्वावलंबी, संघटित व सुखी समाज निर्माण करण्याचा मार्ग दाखवितात. याचा अर्थ असा की, मिशनरी हा त्या गावाचा सर्व दृष्टींनी नेता होतो, कर्णधार होतो. यासाठी केवढी ध्येयनिष्ठा, सेवावृत्ती व त्यागभावना अवश्य आहे याची सहज कल्पना येईल! हे हिंदूंना शक्य आहे काय ?
 मिशनऱ्यांचे मुख्य कार्य म्हणजे धर्मांतर घडवून आणणे हे होय असा आपल्याकडे समज आहे. तो खोटा आहे असे नव्हे; पण स्वदेश व ख्रिस्ती समाज सोडून ते बाहेर जातात तेव्हा धर्मांतर हे त्यांचे उद्दिष्ट असते; पण ते