पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 


मिशनरी- आदर्श :
 या तरुण हिंदुधर्मप्रवक्त्यांनी मिशनऱ्यांप्रमाणे कार्य केले पाहिजे असे आज ७०-८० वर्षे सांगितले जात आहे. आमच्या सुशिक्षित तरुणांनी मिशनऱ्यांप्रमाणे समाजात जाऊन राहिले पाहिजे, असे टिळक म्हणत असत. त्यानंतरच्या काळात ज्यांनी ज्यांनी हिंदुसमाजाची सेवा करण्याचे व्रत घेतले व त्यासाठी संस्था स्थापन केल्या त्यांनी त्यांनी पाश्चात्य मिशनरी हाच आदर्श मानला आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या संस्थेला 'रामकृष्ण मिशन' असे नाव दिले. गजाननराव वैद्य यांच्या संस्थेचे नाव 'हिंदु मिशनरी सोसायटी' असे आहे. केरळमध्ये लाखांनी शुद्धी घडवून आणणारी संस्था म्हणजे 'केरळ हिंदुमिशन'. विमोचित जमातींचा उद्धार करण्यासाठी स्थापन झालेली संस्था म्हणजे 'गाडगे- महाराज मिशन'. जयसिंगपूरजवळचे शशिकला सॅनिटोरियम त्यागबुद्धीने चालविणारे डॉ. भिर्डी यांचा गौरव करताना, मिशनरीवृत्तीने ते काम करतात, असे म्हटले जाते. पंढरपूरच्या अनाथ बालकाश्रमाचे ध्येयवादी, थोर संचालक वि. सी जव्हेरे यांचे 'महाराष्ट्राचे मिशनरी' असे वर्णन वृत्तपत्रे करतात. तेव्हा महाराष्ट्राने व भारतानेही त्याग, ध्येयवाद, लोकसेवा, स्वधर्मनिष्ठा यांचा 'मिशनरी' हा आदर्श मानला आहे. ते तसे मानणे हे सयुक्तिकही आहे; पण तो आदर्श ठेवून चालावयाचे तर त्या आदर्शाचे स्वरूप आपण साकल्याने अवलोकिले पाहिजे. अभ्यासिले पाहिजे. त्यावाचून त्याचे सामर्थ्य आपल्या ठायी येणार नाही.
 गेली चारशे वर्षे युरोपचा सारखा उत्कर्ष होत आहे. त्याचे श्रेय जितके तिकडील शास्त्रज्ञ, संशोधक, राष्ट्रीय नेते, मुत्सद्दी यांना आहे तितकेच युरोपातील धर्मसुधारक व धर्मक्रान्तीचे प्रणेते यांनाही आहे. चौदाव्या शतकाच्या अखेरपर्यंत ख्रिस्ती धर्म हा त्या वेळच्या हिंदुधर्मासारखाच अधोगामी होता. जॉन हस्, लूथर, वायक्लिफ इ. धर्मसुधारकांनी त्यांतील निवृत्ती, कर्मकांड, शब्दप्रामाण्य ही जळमटे नष्ट केली म्हणून युरोपचे मत त्या विकृत धर्मातून मुक्त झाले; पण याहीपेक्षा जेसुइट, मेथॉडिस्ट, क्वेकर, साल्व्हेशन आर्मी या पंथांनी जे कार्य केले ते येथे अभिप्रेत आहे. त्या वेळचा समाज अत्यंत विषम होता. आणि समाजातील बहुसंख्य वर्ग दीन, दलित, अनाथ, रंजले-गांजले असेच असत. या पंथांच्या संस्थापकांनी व त्यांच्या हजारो अनुयायांनी या लोकांच्या सेवेचे