पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२३३
 

नाथपंथी, रामानुज, वल्लभ, हे संप्रदाय इ. पथांतील धर्मधुरीण त्यांच्यांत जाऊन राहिले असते तर ती जमात हिंदुधर्माला पारखी झाली नसती आणि भारताची शत्रू झाली नसती. आज पण या धर्मधुरीणांना त्यांची सावली घेणेही पाप वाटत असे व अजूनही वाटते. त्यामुळे तेथे ते गेले नाहीत; पण येशूचे अनुयायी तेथे गेले आणि त्यांनी हिंदुसमाजाचा एक लचका तोडून भारतापुढे एक बिकट समस्या निर्माण करून ठेवली आहे आणि हिंदुसमाजाचे धुरीण वेळीच जागे झाले नाहीत तर हाच क्रम पुढे चालून अनेक आदिवासी जमाती, हिंदुधर्माला व भारतराष्ट्राला पारख्या होतील. गेल्या जानेवारीत प्रयागला बहुसंख्य हिंदुधर्मधुरीण एकत्र आले होते. त्यांनी हे कार्य शिरावर घेतले पाहिजे. त्यांनी हिंदुसमाजाला वेळीच जागे केले पाहिजे; पण वेळीच जागे करावयाचे म्हणजे काय करावयाचे ? तेच आता सांगांवयाचे आहे.

पुण्याई :
 समाज संघटित कशाने होतो व विघटित कशाने होतो याचे विवरण या लेखमालेतील पहिल्या लेखापासून केले आहे. आणि हिंदुसमाज विघटित कसा व का होत गेला हेही विस्ताराने दाखविले आहे. ती विघटनेची कारणे म्हणजेच शेकडो वर्षे समाजमनात दृढपणे खोल रुतून बसलेली निवृत्ती, शब्दप्रामाण्य, जातिभेद, अस्पृश्यता, व्यक्तिगत मोक्षकल्पना, दैववाद, कर्मकांड इ. अधर्मतत्त्व नष्ट करून राष्ट्रनिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, प्रवृत्तिवाद, प्रयत्नवाद, विज्ञाननिष्ठा, बुद्धिप्रामाण्य, समष्टिधर्म यांचे संस्कार केले तरच हिंदुसमाज संघटित होईल; पण हे काम नुसत्या व्याख्यानाने होणार नाही. व्याख्यात्याच्या शब्दांना काही पुण्याई असेल तरच त्यांचा परिणाम होतो. आज शेकडो तरुण राष्ट्र, विज्ञान, धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र यांचे सम्यक अध्ययन करून आदिवासी, विमोचित (पूर्व गुन्हेगार) जाती, अस्पृश्य, अज्ञ, रूढिग्रस्त, अंध, दीन, दलित, अनाथ यांच्यात जाऊन राहतील, त्यांच्या सुखदुःखांची चिंता वाहतील, खाणे, पिणे, इतर आचार या दृष्टीने त्यांच्याशी एकरूप होऊन जातील तरच त्यांच्या शब्दांना पुण्याई येईल आणि अशा समर्थ वाणीने ते बोलले तरच त्यांना रूढ धर्म नष्ट करून नव्या धर्माचे, राष्ट्रीयतेचे, लोकशाहीचे संस्कार या लोकांच्या मनावर करता येतील आणि यातून संघटित व समर्थ हिंदुसमाज निर्माण होईल.