पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 


अजूनही अपात्रच :
 हिंदुसमाजातील धर्मशास्त्रज्ञांनी गेल्या हजार दीड हजार वर्षे फुटीरवृत्तीचा परिपोष केला आहे. समाजातील एक घटक दुसऱ्यापासून तोडून काढण्यातच सर्व धर्म साठविला आहे, अशी त्यांची कल्पना होती. या समाजातील सर्व जातिवर्णाचे लोक कोणत्याही कारणाने एकत्र येणे ही कल्पनाच त्यांनी अशक्य करून टाकली. परपस्परांत विवाह तर अशक्यच; पण सहभोजन हेसुद्धा पाप ! इतकेच नव्हे तर एका मंदिरात किंवा मठात सर्व हिंदूंनी भजन-कीर्तनासाठी येणे हेसुद्धा निषिद्ध. पण इतकी विघटना करूनही त्या महामूढ धर्मशास्त्रज्ञांचे समाधान झाले नाही. ब्राह्मण- क्षत्रियादि श्रेष्ठवर्णीयांना अस्पृश्यांची सावलीही त्यांनी वर्ज्य केली. यामुळेच हिंदुसमाज हा समाज या पदवीला राहिला नाही व अजूनही तो त्या पदवीला अपात्रच आहे. २० जून ६६ च्या टाइम्समध्ये एक बातमी आहे; अहमदाबादच्या स्वामीनारायण मंदिरात त्या दिवशी सुप्रीम कोर्टाच्या निवाड्याअन्वये अनेक हरिजनांना प्रवेश मिळाला. हरिजनांचा हा दावा १८ वर्षे चालू होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटनेअन्वये हरिजनांना मंदिरप्रवेशाचा हक्क मिळाला असूनही एका मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी त्यांना १८ वर्षे झगडावे लागले. स्पृश्य हिंदुसमाजात अस्पृश्यांविषयी किती जवळीक आहे, आपण सर्व एकधर्मीय आहो, म्हणून आपण संघटित झाले पाहिजे ही भावना त्यांच्यात कितपत रुजली आहे त्याचे हे गमक आहे. अस्पृश्यांनी ही गलिच्छ कामे करण्याचे नाकारले म्हणून त्यांच्या वस्तीवर धाड घालून बायकापोरांना मारहाण करून त्यांच्या घरादारांना स्पृश्य समाजाने आगी लावल्याची उदाहरणे वरचेवर ऐकू येतात. अशा स्थितीत डॉ. आंबेडकरांच्या हजारो अनुयायांनी धर्मांतर केले तसे पुनः पुनः घडत राहिले तर त्यात नवल वाटण्याजोगे काही नाही. आदिवासी लोकांचा प्रश्न असाच आहे. इतके दिवस या जमाती जागृत नव्हत्या. त्यामुळे त्या हिंदुसमाजात कशा तरी राहिल्या. तरी ख्रिस्ती मिशनऱ्यांनी या जमातीतच आपले कार्य सुरू करून सहस्र, लक्षसंख्येने त्यांना वाढविले आणि धर्मातराबरोबर त्यांचे राष्ट्रांतरही घडविले. पाऊणशे वर्षापूर्वी नागा प्रदेशात एकही मिशनरी नव्हता व एकही माणूस ख्रिस्ती झाला नव्हता. त्या वेळी पाश्चात्यविद्या सर्व भारतात पसरली होती व धर्मक्रान्तीची आवश्यकताही बऱ्याच सुशिक्षितांना पटली होती. त्याच वेळी हिंदूंचे शंकराचार्य, इतर मठाधिपती, किंवा वारकरी, रामदासी,