पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२३१
 

वाकणार नाहीत इतके वाकून, त्यांचे स्वागत केले. त्या वेळी सरकारने तुरुंगात घातले ते युकॅरिस्ट काँग्रेसला विरोध करणाऱ्या हिंदूंना. राष्ट्रद्रोही मिशनऱ्यांना नव्हे. कारण भारत सरकार निधर्मी आहे ! नागालँडमध्ये ब्रिटिश सरकारने हिंदी नागरिकांना प्रवेश करण्यास बंदी घातली होती. तेथे फक्त ख्रिस्ती मिशनऱ्यांना मुक्त संचार होता. आश्चर्याची गोष्ट अशी की स्वातंत्र्यानंतरही भारत सरकारने असेच निर्बंध कायम ठेविले आहेत. भारतीय नागरिकांना नागालँडमध्ये प्रवेश करण्यास आजही बंदी आहे. (किर्लोस्कर जून ६६- ले. पंडित) ख्रिस्ती बॅप्टिस्ट मिशनने गेल्या पन्नास वर्षांत धर्मांतर करून जे राष्ट्रांतर घडविले आहे ते. भारतीय नागरिक कदाचित बिघडवितील ! धर्मांतरितांची व राष्ट्रद्रोह्यांची जपणूक हे तर निधर्मीपणाचे प्रधान लक्षण !

ध्येयनिष्ठांची संघटना :
 भारताचे भवितव्य घडविणारी काँग्रेस ही सर्वात मोठी शक्ती, तीच अशी अत्यंत अराष्ट्रीय, जातीय व पराकाष्ठेची स्वार्थी व सत्तैकदृष्टी झाल्यामुळे या भूमीत अपुरी राहिलेली धार्मिक व सामाजिक क्रान्ती पुरी करून राष्ट्रनिष्ठा व लोकशाही यांची तत्वे अखिल भारतीय समाजात खोलवर रुजविण्याचे कार्य तिच्या हातून होणे कालत्रयी शक्य नाही. या कार्यासाठी ध्येयनिष्ठ समाजसेवकांची एक प्रचंड संघटना उभी करणे अवश्य आहे. आणि काँग्रेसमध्ये ध्येयवाद आज औषधालासुद्धा राहिलेला नाही. नैतिक धैर्य, स्वार्थत्याग, ध्येयवाद या दृष्टीने काँग्रेस व काँग्रेस सरकार आज किती खालच्या पातळीवर गेली आहेत याचे काँग्रेसच्या नेत्यांनीच सविस्तृत वर्णन करून ठेवलेले आहे आणि काँग्रेसच्या योजनांचे मूल्यमापन करणाऱ्या ज्या समित्या त्यांच्या अहवालांची पाने तर यांनीच भरलेली आहेत. राष्ट्राचा उत्कर्ष करण्यासाठी, साम्राज्य संघटित करण्यासाठी व सामाजाचे सामर्थ्य वृद्धिंगत करण्यासाठी ध्येयवाद ही शक्ती अवश्य असते आणि तिचाच काँग्रेसमधून संपूर्ण लोप झाला असल्यामुळे त्या ध्येयाच्या सिद्धीसाठी दुसरी तशीच अत्यंत प्रभावी अशी संस्था निर्माण करणे अवश्य आहे. त्या दृष्टीने पाहता विश्वहिंदुपरिषद ही नुकतीच स्थापन झालेली संस्था डोळ्यांपुढे येते. म्हणूनच हिंदुसमाज संघटित करण्यासाठी अशा संस्थेने कोणत्या मार्गाने गेले पाहिजे त्याचे दिग्दर्शन या लेखात करण्याचे ठरविले आहे.