पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

राष्ट्रविघातक आहे. वाटेल त्या वाममार्गांनी हे मिशनरी हिंदूंचे धर्मांतर घडवितात व त्या धर्मांतरित समाजाला राष्ट्रद्रोही बनवितात, हे आता सूर्य- प्रकाशाइतके स्वच्छ झाले आहे. महात्माजींनी अत्यंत स्पष्ट शब्दांत हे सांगितलेले आहे. 'मिशनऱ्यांचा हेतू एकच आहे. हिंदुधर्माचा पाया उखडून तो समूल नष्ट करून तेथे दुसरा धर्म स्थापिणे हा तो हेतू होय. माझ्या हाती सत्ता असती तर मी कायद्याने हे धर्मांतर बंद पाडले असते. अज्ञानी हिंदुसमाजाचा असा फायदा घेणाऱ्या वृत्तीचा मला तिटकारा वाटतो.' जे. सी. कुमारप्पा यांनी मिशनऱ्यांबद्दल हेच उद्गार काढले आहेत. 'मिशनऱ्यांचा धर्मप्रचार असाच चालला तर भारतात लवकरच एक ख्रिस्तिस्थान निर्माण होईल' ही भीती सभापती अनंतशयनम अय्यंगार यांनीही व्यक्त केली आहे. (मसुराश्रम- विश्वकल्याणमाला पत्रक क्रमांक ४, ५, ६, ७- यांच्या आधारे.) डॉ. वेरियर एलविन हे एक इंग्रज पाद्री आहेत. त्यांनी, 'मिशनऱ्यांनी जे धर्मातराचे राष्ट्रद्रोही कार्य चालविले आहे त्याला, भारतीयांनी सावध होऊन वेळीच आळा घातला नाही तर सर्व आदिवासी जनता अराष्ट्रीय होऊन भारताच्या कुशीत ती एक कट्यार घुसेल,' असा इषारा दिला आहे. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात आपले हेच मत ठायी ठायी प्रकट केले आहे. ते तर म्हणतात की, 'ख्रिस्ती झाल्यामुळे अस्पृश्य समाजाची कोणतीच उन्नती झालेली नाही. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सर्व जातिभेद, अस्पृश्यता या बाटलेल्या लोकांत कायम ठेविली आहे. अस्पृश्यांना चर्चमध्ये प्रवेश मिळत नाही आणि इतर जातींना चर्चमध्ये वेगवेगळ्या बाकांवर बसावे लागते.' (माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २१३, ३०२) नियोगीसमितीचा अहवाल तर प्रसिद्धच आहे. धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर होय हे समितीने निर्विवादपणे सिद्ध केले आहे. असे असूनही मिशनऱ्यांच्या या राष्ट्रद्रोही धार्मिक आक्रमणाला पायबंद घालण्याची बुद्धी काँग्रेसनेत्यांना होत नाही. आपल्या हाती कायदा नाही म्हणून महात्माजींना वाईट वाटत होते. त्यांच्या अनुयायांच्या हाती तो आहे; पण ते निधर्मी आहेत ! हिंदुधर्मीयांखेरीज इतर धर्मीयांना दुखविणे त्यांच्या अहिंसेत, उदात्त विचारसरणीत बसत नाही. युकॅरिस्ट काँग्रेसचे प्रतिनिधी 'हिंदुधर्मीयांचे धर्मांतर करण्याची ही अभूतपूर्व संधी आहे.' अशा घोषणा करीत भारतात आले होते. त्या काँग्रेसला बंदी वालणे तर लांबच राहिले; उलट सर्व भारतसरकारने, हिंदुधर्मश्रेष्ठींपुढे कधी