पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

काँग्रेसनेत्यांनी पूर्वी लक्षलक्ष वेळा सांगितले होते ती विषे आता यांनी पौष्टिके ठरविली व त्यांची इंजेक्शने ते समाजाला देऊ लागले. त्यामुळे जातीय व धार्मिक भेद स्वातंत्र्यानंतर लोप पावण्याऐवजी, पूर्वी कधी नव्हते इतक्या जोराने उफाळून आले. या विषयाची गेल्या पंधरावीस वर्षात इतकी चर्चा झाली आहे की, त्याचे पुन्हा विवेचन करण्याचे कारण नाही. 'लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान', 'अराजकाच्या उंबरठ्यावरील भारत' ('वसंत' सप्टेंबर, ऑक्टोबर १९६१) 'भारतीय लोकसत्ता' या ग्रंथांत व लेखांत मी हा विषय सविस्तर व साधार मांडला आहे. पंडित नेहरू, राष्ट्रपती राजेन्द्रबाबू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भाषणांच्या आधारेच तो मांडला असल्यामुळे त्यातील सत्य वादातीत आहे. निवडणुकांची तिकिटे कशी दिली जातात, त्या वेळच्या भाषणांत प्रामुख्याने या विषारांचाच प्रसार कसा केला जातो, मंत्रिपदे, अधिकारपदे यांचे वाटप कसे होते, शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश देताना जात, धर्म, पंथ हीच प्रामुख्याने कशी पाहिली जातात हे सर्व जगजाहीर आहे. इत्यर्थ असा की, संघटनेच्या दृष्टीने विचार करता स्वातंत्र्यानंतर पाऊल प्रगतीच्या मार्गाने न पडता अधोगतीच्या मार्गानेच पडू लागले आणि पुन्हा हा समाज विघटित होऊ लागला. त्याचे भवितव्य पुन्हा धोक्यात आले.

धन्य अहिंसा, धन्य विश्वप्रेम ! :
 मुस्लीमांच्या बाबतीतही काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदुसमाजाला आणि भारताला अत्यंत विघातक असेच धोरण अवलंबिले. फाळणीला मान्यता देऊन त्यांनी पाकिस्तानची निर्मिती केली. रूमशामला, इस्तंबूलला जावे, तेथपर्यंत मराठ्यांचा भगवा ध्वज न्यावा अशी मराठ्यांची आकांक्षा होती. बलुचिस्तान, अफगाणिस्तान येथपर्यंत आपले साम्राज्य विस्तारावे अशी रणजितसिंगाची आकांक्षा होती. ते सर्व लांबच राहिले आणि सिंध, पेशावर, अर्धा पंजाब, अर्धा बंगाल हे प्रांत मुस्लीमांना देऊन भारताच्या नेत्यांनी अफगाणिस्थानच्या अमीराचे स्वप्न दुपटीने सफल करून दिले, आणि हे सर्व अहिंसेपायी ! वैयक्तिक धर्म, वैयक्तिक मोह ही भारतीयांच्या मनाची सर्वांत मोठी विकृती. ती अजूनही निरनिराळ्या रूपांत पुन्हा पुन्हा उद्भवते. सत्य, अहिंसा ही आमच्या नेत्यांची प्रिय तत्त्वे. त्यांपायी राष्ट्रहित नासले तरी त्यांना त्याची परवा नाही. मागल्या