पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२२७
 

वैचारिक पातळीवरून नष्ट करण्यात भारतीय नेत्यांना पुष्कळच यश आले आणि स्वातंत्र्य, समता, बुद्धिनिष्ठा या तत्त्वांना बरेच व्यवहारात आणता आले म्हणूनच त्यांना येथे राजकीय क्रान्ती करण्यात यश आले. त्या तत्त्वांमुळेच येथे राष्ट्रनिष्ठा रुजू शकली, जनशक्ती संघटित झाली आणि स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला.

अपेक्षाभंग :
 स्वातंत्र्यलढ्याचे स्वरूप असे असल्यामुळे, धार्मिक व सामाजिक क्रान्ती ही या विजयासाठी अपरिहार्य आहे हे सर्व नेत्यांना मान्य असल्यामुळे आणि ती घडविण्यासाठी बहुतेक सर्वांनी यावच्छक्य प्रयत्न केलेले असल्यामुळे स्वातंत्र्य- प्राप्तीनंतर ही अपुरी क्रान्ती सत्तेच्या साह्याने पूर्ण करून, त्या क्रान्तीची तत्त्वे जनतेच्या मनात खोलवर रुजवून भारतीयांची राष्ट्रनिष्ठा अभंग करून टाकण्याकडेच स्वातंत्र्याच्या उत्तरकाळचे भारताचे नेते आपले लक्ष केन्द्रित करतील, आपले शक्तिसर्वस्व पणाला लावतील अशी भारतातील सर्वजनांची अपेक्षा होती. स्वातंत्र्यपूर्वकाळात काही नेत्यांच्या तशा प्रतिज्ञाच होत्या. आधी राजकीय सुधारणा होऊन स्वातंत्र्य प्राप्त झाले, सत्ता हाती आली की, सामाजिक व धार्मिक सुधारणा सहज घडविता येतील असे त्यांचे मत होते. ज्यांना प्रारंभापासूनच त्या सुधारणांचे महत्त्व वाटत होते, सर्व क्षेत्रांतील सुधारणा एकदम झाल्या पाहिजेत असे ज्यांचे मत होते त्यांच्याबद्दल तर प्रश्नच नाही. राष्ट्रनिष्ठा हे या सुधारणांचेच फल आहे, त्यांच्या आधारावाचून तिला स्थैर्य व दृढता येणार नाही अशी त्यांची खात्री असल्यामुळे त्या निष्ठेचा हा पाया भक्कम व अभंग करून टाकण्याचा उद्योग, सत्तारूढ होताच ते प्रथम हाती घेतील याबद्दल कोणाला शंकाच नव्हती.
 पण जे कोणाच्या ध्यानीमनी नव्हते तेच भारतात घडले. स्वातंत्र्योत्तर काळातील सत्ताधाऱ्यांच्या वर्तनामुळे सर्वांचा अत्यंत दारुण असा अपेक्षाभंग झाला.

विष हेच पौष्टिक :
 सत्ता हाती येताच धर्म, जाती, पंथ, प्रांत हे भेद नष्ट करण्याचा कसून प्रयत्न करण्याऐवजी ती सत्ता कायम आपल्या हाती टिकविण्यासाठी या भेदांचा आश्रयच सत्ताधारी काँग्रेसपक्ष करू लागला. राष्ट्रनिष्ठेऐवजी निवडणूकनिष्ठा हे आता कॉंग्रेसचे ध्येय झाले आणि ज्या विषांनी भारतीय समाज विघटित होतो असे