पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाज समाज आहे काय ?
११
 

आहे की, देवयानीचा पत्नी म्हणून स्वीकार करताना हा वर्णसंकर होत आहे, हे महापातक आहे, असे ययातीला वाटले. पण शुक्राचार्यांनी त्याला सांगितले की, 'हे पातक खरे, पण मी तुला त्यापासून मुक्त करतो.' आणि त्याप्रमाणे ययाती मुक्त झालाही. पुढील काळी अत्यंत भयावह मानलेल्या वर्णसंकर या पातकाची त्या मागल्या काळी इतकीच प्रतिष्ठा होती. श्रेष्ठ ब्राह्मणांना केवळ आशीर्वाद देऊन लोकांना त्या पातकातून मुक्त करता येत असे. शर्मिष्ठा ही तर असुरकन्या. तिचा तर ययातीशी शास्त्रोक्त विवाहही झालेला नव्हता. तिने फक्त मनाने त्याला वरिले होते. अर्थातच त्यांचीही संतती शूद्र होय. पण त्यांचा पुत्र पुरु हा तर पौरवकुलाचा संस्थापक व अत्यंत श्रेष्ठ असा राजा ठरला. तेव्हा अखिल भारतीय समाजाला एकरूप देताना, आर्य करून सोडताना वैदिक मंत्रांचे संस्कार करणे, भिन्नभिन्न जमातींना थोर कुळांशी निगडित करून टाकणे व प्रत्यक्ष विवाहसंबंध घडविणे, वर्णसंकर घडवून आणणे, असे तीन मार्ग आर्यांनी अनुसरले होते असे दिसते.

आर्य मिशनरी :

 सर्व समाज वैदिक संस्कृतीच्या कक्षेत आणून या अखिल भारतीय लोकसमुदायाला राष्ट्रपदवीला नेण्यासाठी आर्यांनी अक्षरशः हाडाची काडे केली. आज ख्रिस्ती मिशनरी, दक्षिण अमेरिका, आफ्रिका येथील जंगलांत, तेथील रानटी जमातींत आपल्या धर्माच्या प्रसारार्थ, सर्व जगाच्या ख्रिस्ती- करणार्थ घरदार सोडून देऊन, जाऊन राहतात. जीवाचा धोका पत्करतात, संसाराचा उन्हाळा करून घेतात आणि प्रसंगी जाणूनबुजून आत्मबलिदान करतात. प्राचीनकाळी भारतात आर्यानी हेच केले. अगस्य ऋषीचे उदाहरण यासाठीच प्रसिद्ध आहे. अगस्त्य हा मूळचा काशीचा. पण धर्मप्रसाराची आकांक्षा त्याला स्वस्थ बसू देईना. विंध्यपर्वताच्या दक्षिणेस अजून आर्याचा प्रवेश झाला नव्हता. तेथल्या जमाती यज्ञसंस्थेच्या कक्षेत आल्या नव्हत्या. तेव्हा 'कृण्वंतो विश्वमार्यम्' ही प्रतिज्ञा आठवून अगस्त्य विंध्य ओलांडून दक्षिणेतल्या त्या घन, निबिड, महारण्यात प्रवेश करता झाला. आणि त्याने थेट रामेश्वरापर्यंत आश्रम स्थापन करून आर्यसंस्कृतीचा ध्वज ठायी ठायी उभा केला. हे कार्य त्याने किंवा त्याच्या कुलातील पुढील पुरुषांनी केले