पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

आर्थिक क्रांतीची आश्वासने जनतेला मिळाली नसती तर येथे राष्ट्रनिष्ठा ही कधीच उदयाला आली नसती व भारताची शक्ती कधीच संघटित झाली नसती. ब्रिटिश साम्राज्यशक्तीशी लढा करण्यास बहुजनांत जागृती होऊन स्वातंत्र्याच्या चळवळीला व लढ्याला त्यांचा पाठिंबा मिळणे अवश्य होते आणि इंग्रजी राज्य गेल्यानंतर येथे पुन्हा तेच चातुर्वर्ण्य, तोच ब्राह्मण-क्षत्रियांचा जन्मजात अधिकार, सावकार, व्यापारी, कारखानदार यांनी चालविलेला तोच रक्तशोष, तेच दारिद्र्य, तेच दास्य, तीच अवकळा, अस्पृश्यतेचा तोच नरक- हेच आपल्या कपाळी आहे असे जर बहुजनांना वाटत राहिले असते तर ते स्वातंत्र्यसंगरात कधीही सहभागी झाले नसते. अस्पृश्य हे तर या स्वातंत्र्यलढ्यापासून बहुतेक दूरच राहिले. कारण इंग्रजांच्या राज्यातच आपले हित आहे, स्वातंत्र्य आले तर पुन्हा स्पृश्य हिंदू आपला पूर्वीसारखाच छळ करतील, ही भीती त्यांना होती. सार्वजनिक तलावावर पाणी भरण्याच्या हक्कासाठी, सार्वजनिक देवळात प्रवेश मिळविण्यासाठी डॉ. आंबेडकरांना लढे करावे लागले, आणि ते करूनही हिंदूंना उमज पडत नाही हे पाहून त्यांना धर्मांतर करावे लागले यावरून ही त्यांची भीती सार्थ होती, यात शंका नाही; पण महात्माजींनी चालविलेली अस्पृश्योध्दाराची चळवळ व स्पृश्य हिंदूंनी त्यासाठी स्थापिलेल्या अनेक संस्था आणि प्रत्यक्षात काही अंशी अस्पृश्यतेचे निर्बंध ढिले करून त्या समाजाला दिलेला विसार, यांमुळेच त्यांचा विरोध बराच कमजोर झाला. धार्मिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय चळवळीत भेद करणे योग्य नाही, एक आधी व एक मागून या म्हणण्याला काही अर्थ नाही हे रानडे, दादाभाई, आगरकर, सावरकर, आंबेडकर यांचे म्हणणे कसे पूर्ण सार्थ होते ते स्वातंत्र्याच्या चळवळीला शेवटी जे रूप आले त्यावरून सहज दिसून येते. सर्व धर्मपंथ, सर्व वर्ण, सर्व जाती, सर्व वर्ग यांना स्वातंत्र्यामुळे आपला उत्कर्ष होईल, आजच्यापेक्षा स्वातंत्र्या- नंतर आपली स्थिती थोडी तरी सुधारेल अशी निश्चिती वाटल्यावाचून त्या लढ्यात उतरण्याची त्यांची कदापि सिद्धता होत नाही आणि ही निश्चिती धार्मिक व सामाजिक क्रान्तीवाचून, म्हणजे त्या क्षेत्रातील विषमतेची रूढ तत्त्वे नष्ट करून समता, स्वातंत्र्य, बंधुता यांची तेथे प्रस्थापना झाल्यावाचून होणे शक्य नसते. राममोहन रॉय यांच्यापासून महात्माजींपर्यंत भारताच्या सर्व नेत्यांनी आधी धर्मक्रान्ती करण्याचे धोरण अवलंबिले याचे हेच कारण आहे. रूढ धर्मतत्त्वे