पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२२५
 

ग्रंथ लिहून स्वत्वाचा अभिमान जसा जागृत केला तसाच बहुजनांच्या तोंडचा घास सरकार काढून घेत आहे, त्यांच्यावर करांचे असह्य ओझे लादीत आहे हे दाखवून इंग्रजांविषयी द्वेष व असंतोषही पेटवून दिला. वासुदेव बळवंत, चाफेकर, वीरेन्द्रकुमार घोष, भूपेन्द्रनाथ दत्त आणि या सर्वांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सशस्त्र क्रान्तीच्या मार्गाने वधस्तंभावर चढून हेच कार्य केले. आचार्य जावडेकर म्हणतात, 'परकीय सत्तेच्या आक्रमणामुळे दारिद्र्य व बेकारी वाढत आहे, याची जाणीव सर्वांना होत होती. ही जाणीव आणि आपल्या परंपरागत संस्कृतीचा अभिमान यांची गाठ पडताच क्रांतीवादी व जहाल राजकारणाचा जन्म झाला. ही गाठ घालून देण्याचे काम लोकमान्यांनी केले.' (आधुनिक भारत- पृ. २३६)
 नव्या क्रांतिकारक विचारांचा परिपाक होऊन भारतात राष्ट्रनिष्ठा कशी विकसत गेली याचे महर्षी दादाभाईनी १८८० सालच्या एका भाषणात चांगले वर्णन केले आहे. ते म्हणतात, 'सर्व वर्गातल्या व थरांतल्या हजारो लोकांना आज जे शिक्षण मिळत आहे त्यामुळे त्यांची मने एकाच मुशीत घडत आहेत. त्या सर्वांच्या भावना समान होत आहेत, आकांक्षा समान होत आहेत व विचार समान होत आहेत आणि विशेषतः या जागृतीतून राजकीय संघटन व सहभाव निर्माण होत आहे. कारण सर्वानाच दारिद्र्याची झळ लागली असून आपल्या देशाचा होत असलेला अधःपात आणि नाश स्पष्ट दिसत आहे. धर्म, वंश, पक्ष हे भेद या समाईक ध्येयात वितळून जात आहेत. हिंदू, मुसलमान, पारशी सर्वांनाच इंग्रजी राज्य हे वरदान आहे की शाप आहे हा प्रश्न पडला आहे आणि त्यामुळे देशाच्या राजकारणाने सर्वांची मने व्यापिली आहेत. देशाची अधोगती अशीच चालू राहिली, बहुजनांची सुखाची आशा नष्ट झाली तर लोकांची राजनिष्ठा भंगेल आणि ब्रिटिश मालाबद्दलचा आजचा द्वेष हा ब्रिटिश सत्तेकडे वळेल.'
 हे १८८० सालचे भाषण आहे. पुढील साठसत्तर वर्षांत लो. टिळक, सावरकर, महात्माजी, पंडितजी, नेताजी यांनी हेच घडवले व त्या संघटित शक्तीच्या बळावर ब्रिटिश सत्ता नष्ट करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

सार्थ भीती :
 ज्या धार्मिक व सामाजिक क्रान्तीचे येथवर वर्णन केले ती येथे झाली नसती,
 १५-१६