पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नव्हते आणि त्यांच्या त्या अभिमानाचा समाजसंघटनेशी काही संबंध नव्हता; पण पाश्चात्यविद्या येथे आल्यापासून भारतीयांनी इतिहासाचा अभ्यास सुरू केला. त्यामुळे प्राचीन ग्रंथांचे खरे वैभव त्यांना कळून आले. शिवाय चंद्रगुप्त मौर्य, शातवाहन, विक्रमादित्य, चंद्रगुप्त, समुद्रगुप्त इ. महापराक्रमी सम्राटांचा जो पराक्रम गेली हजार वर्षे विस्मृतीत गेला होता तोही आता इतिहाससंशोधनामुळे प्रकाशात आला. यामुळे भारतीयांचा परंपराभिमान जास्तच दृढ झाला. हा अभिमान जागृत होऊ नये म्हणून वेद-उपनिषदादि ग्रंथ फार प्राचीन नाहीत; रामायण, गीता हे ग्रंथ उसनवारीने रचलेले आहेत; हिंदू लोकांना चारित्र्य नाही, त्यांच्या ठायी काव्यप्रतिभा असणे शक्य नाही, मराठ्यांच्या राज्याला कसलीही तात्त्विक बैठक नव्हती, इ. निरर्गल निंदा इंग्रज मिशनरी, पंडित व अधिकारी करीत होते. न्या. मू. तेलंग, लो. टिळक, चिंतामणराव वैद्य, वि. का. राजवाडे, रमेशचंद्र दत्त, बसू, डॉ. जयस्वाल, अयंगार यांनी या निंदेला पाश्चात्यांच्याच ऐतिहासिक शस्त्रास्त्रांनी उत्तर देऊन भारतीय संस्कृतीचे प्राचीनत्व व स्वयंसिद्धत्व शंकातीत करून टाकले. त्यामुळे परंपराभिमानाला ज्ञानाचा पाया प्राप्त होऊन त्याला अधिकच उत्कटता व तेज आले.

अभिमान आणि द्वेष :
 याच काळात पितामह दादाभाई नौरोजी, न्या. मू. रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, प्रिन्सिपल आगरकर, लो. टिळक, ना. गोखले, सुरेन्द्रनाथ बॅनर्जी, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, सुब्रह्मण्य अय्यर, वीर राघवाचार्य इ. नेत्यांनी इंग्रजी राज्याचे हिडिस अंतरंग, त्याचे खरे काळे स्वरूप भारतीय जनतेला उघडे करून दाखविण्यास प्रारंभ केला होता. ब्रिटिशांनी चालविलेला अर्थशोष, मिशनऱ्यांकरवी त्यांनी चालविलेले धार्मिक आक्रमण, त्यांच्या राज्यातील भयानक अन्याय, इंग्रज अधिकाऱ्यांचे असह्य उद्दाम, उर्मट वर्तन, भारताच्या आर्थिक उन्नतीला सतत पायबंद घालण्याची त्यांची वृत्ती, दुष्काळ, साथीचे रोग यांच्या निवारणाच्या मिषाने गोऱ्या सोजिरांनी केलेले अत्याचार या सर्वांचे वर्णन वृत्तपत्रे रोज करीत व त्यामुळे इंग्रज राज्यकर्त्याविषयी कडवा द्वेष भारतीय जनतेत निर्माण झाला. स्वराष्ट्र, स्वधर्म, पूर्वपरंपरा यांचा अभिमान ही राष्ट्रनिष्ठेची एक बाजू होय. आक्रमक सत्ताधारी, राज्यकर्ते यांच्याबद्दलचा जहरी द्वेष ही त्याची दुसरी बाजू होय. लो. टिळकांनी मृगशीर्ष, आर्याचे मूलस्थान, गीतारहस्य इ.