पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२२३
 

त्यांच्याही तत्त्वज्ञानाचे मुख्य सूत्र आहे. व्यक्ती हे अंतिम मूल्य आहे हा अत्यंत उदात्त विचार त्या सूत्रातूनच विकसित झालेला आहे. या विचाराचा उपदेश करूनच एक व्यक्ती आपल्या विवेकाने निश्चित केलेल्या सत्यासाठी अखिल विश्वाविरुद्ध लढा करू शकते, निःशस्त्र असताही लढा करू शकते, हे फार मोठे तत्त्व त्यांनी प्रस्थापित केले आणि हीन, दीन अशा भारतीय जनतेला व्यक्तित्वाचे असामान्य सामर्थ्य प्राप्त करून दिले. दक्षिण आफ्रिकेत, चंपारण्यात, खेडा जिल्ह्यात सामर्थ्य निर्मितीचा हा अलौकिक चमत्कार महात्माजींनी करून दाखविला. तेथे ज्यांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीशी लढा केला ते लोक हिंदुसमाजाच्या अगदी खालच्या थरातले होते. शेकडो वर्षे ते तेथेच पिचत होते. त्यांना उन्नत होण्यास हिंदुधर्मशास्त्राच्या चौकटीत कधीही अवसर मिळाला नसता. तो मिळत नव्हता म्हणूनच हा समाज शेकडो वर्षे पारतंत्र्याच्या नरकात सडत होता. जुने धर्मशास्त्र कोणाही व्यक्तीकडे तिच्या जातीतून, वर्णातून पाहात असे. त्या जातीची वा वर्णाची ती एक घटक एवढेच तिचे स्थान होते. व्यक्तित्व हेच अंतिम मूल्य हा विचार युरोपात विद्येच्या पुनरुज्जीवनामुळे निर्माण झाला. औद्योगिक क्रान्तीमुळे तो बळावला. विज्ञाननिष्ठेमुळे त्याचा परिपोष झाला आणि त्यातूनच युरोपचे सर्व वैभव निर्माण झाले. अत्यंत निराळ्या भूमिकेवरून पण महात्माजींनी तेच तत्त्व भारतीय जनतेला सांगितले आणि सत्याग्रह लढ्याला तिला उद्युक्त करून तिच्या ठायी एक महाशक्ती निर्माण केली.

परंपराभिमान :
 ही महाशक्ती, हे महातेज म्हणजेच राष्ट्रनिष्ठा हे संघटनतत्त्व होय. वर सांगितलेली धर्मक्रान्ती व सामाजिक क्रान्ती घडविणारे लोक जरी अंतर्मुख होऊन स्वसमाजावर प्रखर टीका करीत असत तरी भारताच्या प्राचीन वैभवाचा, पूर्वपरंपरेचा त्यांना प्रखर अभिमान होता. हिंदुसमाजाच्या पुनर्घटनेची त्यांनी जी तत्त्वे सांगितली त्यांना ते वेद, उपनिषदे, महाभारत, गीता यांचाच आधार घेत. आगरकरांसारख्यांना असा आधार घेणे पसंत नव्हते. तरी पाश्चात्य सुधारणांचा अंगीकार करावयाचा तो आपले प्राचीन आर्यत्व न सोडता करावयाचा, असेच त्यांचे मत होते. प्राचीन काळातील हिंदुसमाजाच्या नेत्यांना पूर्वपरंपरेच अभिमान होता; पण तो आंधळा होता. वेद, उपनिषदे, गीता यांची चिकित्स