पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

स्वातंत्र्य नाही ते राष्ट्र मेल्यासारखे होय; म्हणून हे स्वातंत्र्य नष्ट करू पाहणारा मनुष्य राष्ट्राचा शत्रू समजला पाहिजे, असे ते सांगत असत. निवृत्तिवाद हा समाजाला किती घातक आहे हे तरुणपणी त्यांनी गीतेच्या अध्ययनास आरंभ केला तेव्हाच त्यांच्या ध्यानात आले होते. मंडालेच्या तुरुंगात सवड मिळताच गीतारहस्य हा ग्रंथ लिहून, हजारो वर्षे विस्मृतीत पडून राहिलेला गीतेचा जो कर्मयोग म्हणजेच प्रवृत्तिधर्म त्याचे त्यांनी अभ्युत्थान केले आणि एका जुनाट रोगापासून भारताला मुक्त केले. जातिभेद व जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्य त्यांना कधीच मान्य नव्हते, पण प्रारंभी त्यावर काही धोरणाने ते टीका करीत नसत; पण राजकीय चळवळीला उधाण येऊ लागले तेव्हा जन्मसिद्ध चातुर्वर्ण्य मानणे लोकशाहीच्या काळास अननुरूप आहे व सर्व जातींच्या लोकांनी स्वराज्याच्या कार्यात पडणे व जातिभेद जन्मसिद्ध न मानता गुणकर्मानुसार मानणे हेच युक्त होय, असे सांगण्यास त्यांनी प्रारंभ केला. ही उक्ती त्यांनी मागून सांगितली असली तरी ती कृती मात्र त्यांनी प्रारंभापासून आरंभिली होती. कारण त्यांना लोकशक्ती जागृत करावयाची होती. महार, मांग, चांभार, ब्राह्मण, मराठे, कुणबी हे सर्व गणेशोत्सवात एकत्र आले पाहिजेत असा त्यांचा प्रयत्न व शिकवण असे. त्यांना दुसरे काही करणे शक्यच नव्हते. कारण ब्रिटिश साम्राज्यशक्तीशी लढा देण्यासाठी त्यांना लोकांत जागृती करावयाची होती, त्यांचा स्वाभिमान उद्दीपित करावयाचा होता, त्यांचे व्यक्तिमत्त्व कणखर करावयाचे होते. त्यामुळेच मजूर, काबाडकष्ट करणारे लोक, शेतकरी, कारागीर, कोष्टी, साळी, माळी, भिल्ल, कातवडी ह्या शतकानुशतके निद्रिस्त असलेल्या समाजाला ते 'केसरी'च्या पानापानातून आवाहन करीत होते. खरी सर्वांगीण क्रांती ती हीच होय. अन्यायाचा प्रतिकार करण्याची बुद्धी व शक्ती एकदा मनुष्याच्या मनात जागृत झाली की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेल्या सुप्त स्वदेशी शृंखला त्याच्या पायात क्षणभरही टिकू शकत नाहीत. टिळकांनी भारतीय जनतेच्या मनातली हीच सुप्तशक्ती जागृत केली आणि धार्मिक, सामाजिक, आर्थिक व सर्व प्रकारच्या क्रान्तीचा पाया घातला. तीतूनच अग्नीसारखे महातेज निर्माण करून महात्माजींनी त्यात ब्रिटिश साम्राज्याची आहुती दिली.

व्यक्तित्वजागृती :
 महात्माजी हे लो. टिळकांसारखेच धर्मप्रणेते होते. मानवत्वाची प्रतिष्ठा हे