पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२२१
 

प्रदेशांत प्रसृत करण्याचे धोरण इंग्रज सरकारने अवलंबिले असल्यामुळे, नवविचारप्रवाह सर्व प्रदेशांत वाहू लागले होते आणि प्रत्येक प्रांतातील सुधारक आपल्या वाणीने व लेखणीने ते विचार या भूमीत दृढमूल करण्याचा प्रयत्न करीत होते. ईश्वरचंद्र विद्यासागर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी रामतीर्थ, दादोबा पांडुरंग, ज्योतिबा फुले, लोकहितवादी, आगरकर, पंडित अयोध्यानाथ, लाला हंसराज, लाला लजपतराय, स्वामी श्रद्धानंद, आनंदा चालू, सुब्रह्मण्य अय्यर इ. भारतातील अनेक नेत्यांना, कार्यकर्त्यांना व विचारवंतांना गेल्या हजार वर्षात येथल्या लोकांना जे प्रश्न प्रतीत झाले नाहीत तेच नेमके प्रतीत झाले. त्यामुळे आपल्या समाजाचे अवनत रूप पाहून त्यांच्या पायांखालची धरणी हादरून गेली आणि समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचा दृढनिश्चय करून त्यांनी ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज, सत्यशोधक समाज, महाजनसभा, भार्गवसभा, हिंदू युनियन क्लब अशा अनेक संस्था स्थापन केल्या आणि बंगाल हेरल्ड, बंगाली, अमृतबझारपत्रिका, दर्पण, इन्दुप्रकाश, दीनबंधु, हिंदू, स्वदेशमित्रम्, इंडियन हेरल्ड, रीजनरेटर ऑफ आर्यावर्त अशी वृत्तपत्रे काढली व सर्व भारतभर नवविचारांचे एक प्रचंड आंदोलन घडवून आणले.

नवी संघटनतत्त्वे :
 आणि यातूनच राष्ट्रनिष्ठा व लोकशाही या संघटनातत्त्वांची वीजे सर्वत्र पडून लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांना अखिल भारताची संघटना करून इंग्रजी साम्राज्यशक्तीशी लढा देण्याचे सामर्थ्य भारतीय समाजात निर्माण करता आले. हे दोघेही महापुरुष धार्मिक व सामाजिक परिवर्तनाचे पुरस्कर्ते होतेच; पण भारताचे राजकीय स्वातंत्र्य हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे त्या सर्वांगीण क्रान्तीतून निर्माण झालेल्या शक्तीला त्यांनी राष्ट्रीयत्वाची जोड दिली व या भूमीत एक अभूतपूर्व सामर्थ्य निर्माण केले. टिळकांच्या उदयापर्यंत नवधर्मतत्त्वे ही बव्हंशी वैचारिक पातळीवर होती व सामान्यतः सुशिक्षित वर्गापर्यंतच त्यांचा प्रसार मर्यादित होता. स्वातंत्र्यासाठी भारताची लोकशक्ती जागृत करावयाची असे ठरवून टिळकांनी आतापर्यंतच्या चळवळींची बैठक बदलली व त्यांना अखिल भारतव्यापी रूप दिले. विचारस्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्माच होय. त्याचा अत्यंत जोराने टिळकांनी पुरस्कार केला. जेथे विचार-