पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

चातुर्वर्ण्य हे जन्मसिद्ध नसून ते गुण कर्मांवर अवलंबून असावे, वैदिक धर्माचे दरवाजे सर्व धर्मीयांना खुले असावे व शुद्धीकरणाने कोणासही या धर्मात प्रवेश मिळावा, अशी दयानंदांच्या आर्यसमाजाची तत्त्वे आहेत. मूर्तिपूजा, बालविवाह, स्त्रीदास्य, अस्पृश्यता या रूढींवर समाजाचे नेते प्रखर हल्ला करतात. स्वामी दयानंदांना लाला हंसराज, स्वामी श्रद्धानंद, लाला लजपतराय यांसारखे थोर अनुयायी मिळाल्यामुळे पंजाबात धर्मक्रान्तीची जी बीजे पेरली गेली त्यांचा त्वरेने विकास झाला.

भौतिकवादाचे माहात्म्य :
 स्वामी विवेकानंदांचे धर्माच्या अभ्युत्थानाचे कार्य प्रसिद्धच आहे. त्याचे वर्णन करण्याची गरजच नाही. त्यांना कोणती धर्मक्रान्ती अभिप्रेत होती याची कल्पना यावी म्हणून त्यांच्या भाषणातील एकच उतारा देतो. "आमच्यावर मुसलमानांचे आक्रमण झाले, ख्रिस्त्यांचे झाले. आमच्यांपैकी कोट्यवधी लोक धर्मच्युत झाले; पण त्यांनी तसे न व्हावे म्हणून कोणती व्यवस्था आम्ही केली होती? जे भिकारी होते, हीनदीन दरिद्री होते, त्यांना आम्ही थोडे सुख देण्याऐवजी निवृत्तीचे धडे देत बसलो. आमच्या पंडितांनी सगळा धर्म सोवळ्या- ओवळ्यात आणून ठेविला आणि ऐहिक वैभवाकडे दुर्लक्ष केले. अध्यात्माचा त्यांनी अतिरेकच केला. तेव्हा आता आत्मोद्धारासाठी आपण भौतिकवादाचा आश्रय करणे अवश्य आहे. एका दृष्टीने भौतिकवाद आला तो आपल्या उद्धारार्थच आला आहे. त्यामुळे जन्मनिष्ठ उच्चनीचता नष्ट होईल, बुद्धिप्रामाण्य निर्माण होऊन धर्मग्रंथांची ठेव सर्वांच्या हाती येईल व सुखी जीवनाचे दरवाजे सर्वांना खुले होतील. पश्चिम ही धनिकांच्या टाचेखाली चेंगरली असली तर पूर्व ही धर्ममार्तडांच्या टाचेखाली चिरडली आहे, हे ध्यानात ठेवा. आता एकीने दुसरीवर नियंत्रण ठेवून समतोल राखिला पाहिजे. केवळ अध्यात्माने जगाची प्रगती होणार नाही."
 राममोहन, रानडे, दयानंद, विवेकानंद यांना जी सर्वांगीण क्रान्ती अभिप्रेत होती, त्यांना जे समाजरचनेचे नवे तत्त्वज्ञान समाजाला सांगावयाचे होते ते गेल्या शतकात प्रांतोप्रांतीच्या शेकडो लहानमोठ्या सुधारकांच्या मनात उदित झालेले होते. हे तत्त्वज्ञान पाश्चात्त्य विद्येचे फळ असल्यामुळे व ती विद्या सर्वच