पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

भारतीयांचे हे असे वर्णन केले आहे. मूढ धर्मशास्त्रकारांनी प्रसृत केलेल्या हीन धर्मामुळे हिंदुसमाजाचा शतमुखांनी कसा विनिपात झाला होता, हे यावरून कळून येईल.

सर्वांगीण क्रान्ती :
 अशा या पतित समाजात सर्वांगीण क्रान्तीची बीजे पेरणारे पहिले थोर पुरुष म्हणजे राजा राममोहन रॉय हे होत. त्यांनी प्रथम रूढ हिंदुधर्मावर अत्यंत प्रखर टीका करण्यास प्रारंभ केला. कारण धर्मक्रान्ती झाल्यावाचून, विकृत धर्मकल्पनांपासून समाज मुक्त झाल्यावाचून, येथे दुसरी कसलीही क्रान्ती होणे शक्य नव्हते. कारण धर्माची सत्ता त्या वेळी सर्वंकष अशी होती. व्रतेवैकल्ये, उद्यापने हे सर्व कर्मकांड, मायावाद शिकविणारी निवृत्ती, बुद्धिनाश करणारे ग्रंथप्रामाण्य, समष्टिभावना मुळातच खुडून टाकणारा जातिभेद, स्त्रीचे दास्य व त्यातून निर्माण झालेली सतीची दुष्ट रानटी चाल ही सर्व हिंदुधर्माच्या विकृतीची लक्षणे होत, असे राममोहन यांचे मत होते. आपल्या लेखांतून, पत्रांतून व व्याख्यानांतून त्यांनी या अधर्मावर सतत भडिमार चालू ठेविला होता आणि त्याच वेळी भौतिकविद्यांची उपासना या देशात व्हावी असे प्रयत्न त्यांनी चालविले होते. कंपनी सरकारने कलकत्त्यास संस्कृत पाठशाळा काढून येथल्या न्याय, मीमांसा, वेदान्त इ. जुन्याच विद्यांचे अध्यापन करण्याचे धोरण आखले होते. त्यावर टीका करताना राममोहन म्हणतात की, 'आम्हांस अशी आशा वाटत होती की, या पाठशाळेत हिंदी लोकांना गणित, भौतिक विद्या, रसायनशास्त्र, शारीरविद्या व इतर ज्या शास्त्रांना पूर्णत्वास नेल्यामुळे युरोपीय राष्ट्रे जगातील लोकांच्या पुढे गेली आहेत ती शास्त्रे शिकविण्यासाठी बुद्धिमान व विद्वान युरोपियनांची नेमणूक होईल.' लॉर्ड बेकन याच्या काळापासून ज्या भौतिक दृष्टिकोणाचा अवलंब युरोपने केला त्याच दृष्टिकोणाचा अवलंब करून, आधुनिक भारताने आधुनिक, भौतिक व सामाजिक विद्यांचे अध्ययन केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. ब्रिटिश सरकारने हा त्यांचा आग्रह मानला आणि भारतीय पंडितांनी अनन्य भक्तीने या पाश्चात्य विद्यांची उपासना केली; म्हणूनच भारतात क्रान्ती घडविणे विसाव्या शतकातील त्याच्या नेत्यांना शक्य झाले.