पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२१७
 

काही ब्राह्मणांनी अनुष्ठाने बसविली होती व श्रीगणपतीस व महालक्ष्मीस नवस केला होता !

राष्ट्राभिमान नाही :
 हे सर्व वाचले म्हणजे आजच्या सुशिक्षित मनाला मोठा विस्मय वाटतो, खेद होतो; पण एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात राष्ट्रीयत्वाचे कसलेही संस्कार भारतीय मनावर झालेले नव्हते आणि स्वाभिमान, स्वत्व यांचा या भूमीत संपूर्ण लोप झालेला होता, हे ध्यानी घेतल्यावर यात विस्मयावह काही नाही, हे लक्षात येईल. अनेक इंग्रजांनी हे जाणून तसे लिहूनही ठेविले आहे. 'हिंदी लोकांना आत्मप्रत्यय वाटत नाही. त्यांच्यांत राष्ट्राभिमान नाही व ते एकजूट करू शकत नाहीत, हेच आपल्या साम्राज्याचे सामर्थ्य आहे. आपल्या गावापलीकडे देशाचे प्रेम म्हणजे काय याचे ज्ञान हिंदी लोकांना नाही. राज्यसंस्थेविषयी ते अगदी बेफिकीर असतात. जो पगार देईल त्याच्यासाठी ते लढतील व चांगल्या पगाराच्या व लुटीच्या आशेने शत्रूलाही जाऊन मिळतील.' (फ्रेड्रिक जॉन शोअर) येथील सामान्य जनता राष्ट्रनिर्मितीच्या ज्ञानापासून अलिप्त आहे. येथील राज्यकर्ते, संस्थानिक, परकीयांविरुद्ध एकजुटीने लढून स्वातंत्र्यस्थापना करण्यास नालायक आहेत आणि येथील विद्वानांना जगाचे, भौतिक शास्त्रांचे आणि सामाजिक विद्यांचे गाढ अज्ञान आहे, हे मनरो मालकम, एल्फिन्स्टन यांना दिसत होते. (आधुनिक भारत- पृ. ३५) हिंदी राजे, संस्थानिक किंवा त्यांचे विद्वान- अविद्वान मुत्सद्दी हिंदुस्थानात राष्ट्रीयत्व निर्माण करू शकत नाहीत. कारण ते जगाच्या संस्कृतीत मागासलेले, अर्धरानटी, आपसात भांडणारे, परकी प्रभुत्वाची चीड न बाळगणारे, धर्मवेडात गुरफटलेले, आधुनिक राष्ट्रनिर्मितीस पारखे, लोकसत्तेचे ज्ञान नसलेले आणि जगातील घडामोडी न जाणणारे असे आहेत, हे ब्रिटिश मुत्सद्दी जाणून होते. (कित्ता पृ. ३०) म्हणजे राष्ट्रत्वाच्या दृष्टीने येथील सर्व वर्ग शूद्र अथवा दास बनले होते. आपल्या धर्माच्या व संस्कृतीच्या रक्षणास स्वराज्य हवे याची जाणीवही त्यांच्यात उरली नव्हती. आमच्या अंगी केवळ वैयक्तिक सद्गुण होते; पण राष्ट्रनिर्मितीस व स्वराज्यनिर्मितीस लागणाऱ्या सद्गुणांचा संपूर्ण लोप झाला होता; (कित्ता पृ. २४). आचार्य जावडेकरांनी त्या काळच्या अनेक इंग्रज पंडितांच्या व अधिकाऱ्यांच्या आधारे त्या काळच्या