पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

क्रूर व रानटी अशा होत्या. त्या सर्व मध्य आशियातून टोळधाडीसारख्या भारतात आल्या होत्या. पण एक-दोन पिढ्यांतच त्या सुसंस्कृत झाल्या आणि वैदिक, बौद्ध हे भारतातले धर्म स्वीकारून ब्राह्मणांना भूमिदान करणे, लक्षब्राह्मण- भोजन घालणे, त्यांचे विवाह करून देणे, परमभागवत म्हणवून घेणे इ. भारतीय आचार त्यांनी स्वीकारले व कालांतराने येथल्या समाजांशी ते लोक एकरूप होऊन गेले. शिलालेख, नाणी, जयस्तंभ अशा अस्सल पुराव्यांनी हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे. वर निर्देशिलेल्या ज्या अनेक कथा, त्यांच्याकडे या दृष्टीने पाहिले तर वैदिक काळात आर्यांनी सर्वं भारतीय समाजाला एकरूप करण्याचे जे प्रयत्न केले त्यांचेच स्वरूप त्या कथांतून स्पष्ट होते असे ध्यानात येईल. कनिष्काचा नातू कुशाण राजा वासुदेव हा परमभागवत म्हणून प्रसिद्ध आहे. हा इतिहास आहे. त्यावरून अशाच पद्धतीने प्राचीन आर्यांनी कश्यप, विश्वामित्र, वसिष्ठ, यदु, पुरु यांच्याशी येथील जमातींचे संबंध जोडून त्यांना वैदिकांच्या यज्ञप्रधान संस्कृतीत समाविष्ट करून घेतले, असा मागला इतिहास दिसू लागतो.
 भृगु, आंगिरस, मरीची, अत्रि, वसिष्ठ, पौलस्त्य, पुलह व ऋतु ही ब्राह्मणांची आठ कुळे श्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांतील पौलस्त्यापासून राक्षस, वानर, किन्नर व यक्ष या जमाती निर्माण झाल्या व पुलहापासून किंपुरुष, पिशाच्च, भूत, सिंह व वाघ अशी प्रजा निर्माण झाली. यावरून भारतातील सर्व जमाती या प्रत्यक्षात एकवंशीय असल्या पाहिजेत किंवा आर्येतर जमातींना ऐतिहासिक काळातील शककुशानांप्रमाणे आर्य संस्कृतीत समाविष्ट करताना आर्यांनी त्यांचा संबंध ब्राह्मण क्षत्रिय कुलांशी जोडून दिला असला पाहिजे, असे दिसते. शुक्राचार्य हे असुरांचे गुरु होते. आणि ययाती या आर्य क्षत्रिय राजाने त्यांची कन्या देवयानी हिच्याशी विवाह केला. त्याचप्रमाणे असुरराजा वृषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा हिच्याशीही (मनाने) विवाह केला. तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय व अमुर हे एकवंशीय तरी असले पाहिजेत किंवा वर्णसंकर करण्यात त्यांना कसलाही अधर्म वाटत नसला पाहिजे. देवयानी ही ब्राह्मणकन्या. ययाती हा क्षत्रिय. म्हणजे हा प्रतिलोम विवाह. पुढील काळातल्या धर्मशास्त्राप्रमाणे यांची प्रजा शूद्र होय. पण त्यांचा मुलगा यदु हा प्रसिद्ध यादव कुलाचा मूळपुरुष मानला जातो. श्रीकृष्ण त्यांच्याच कुळात झालेला आहे. महाभारतात सांगितले