पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

नाही. त्याच्या आधीच्या तीस-चाळीस वर्षांच्या भारताच्या इतिहासाकडे पाहिले तर आपली आपल्याला लाज वाटावी अशी परिस्थिती येथे होती असे दिसून येईल.

साहेबासाठी अनुष्ठाने :
 पहिली लज्जास्पद गोष्ट आपल्या ध्यानात येते ती ही की, या येवढ्या विस्तीर्ण देशात कोणत्याही प्रदेशाला, कोणत्याही समाजाला स्वराज्य नको होते. 'हिंदुस्थान का व कसा जिंकला गेला?' या 'आधुनिक भारत' या आपल्या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात आचार्य जावडेकरांनी या स्वत्वशून्य वृत्तीचे तपशिलाने वर्णन केले आहे. त्यावरून असे दिसून येईल की, पेढीवाले, सावकार, व्यापारी, सरदार, जमीनदार, लष्करी अधिकारी, ब्राह्मण, रजपूत, सर्व-सर्व ब्रिटिशांना येथे राज्य स्थापण्यास सर्व प्रकारे मदत करीत होते आणि त्यांची सत्ता प्रस्थापित व्हावी म्हणून आतुर झाले होते. गुप्त पेढीवाल्यांनी प्रत्येक लढाईच्या वेळी इंग्रजांना गुप्त माहिती पुरवून व द्रव्याचे साहाय्य करून, आपल्या राजनिष्ठेविषयी कंपनी सरकारकडून प्रशस्तिपत्रे मिळविली होती. बंगालप्रांत लॉर्ड क्लाइव्हने घेतला त्या वेळी तेथील हिंदू व्यापाऱ्यांनी व जमीनदारांनी ब्रिटिशांना सर्वतोपरी साह्य केले, हे हिल्ल, कर्नल स्कॉट, रॉबर्टस् या इंग्रज लेखकांनीच लिहून ठेविले आहे. यावेळी हे व्यापारी व जमीनदार मुसलमान नवाबांच्या जुलमाला अत्यंत कंटाळून गेले होते, हे खरे; पण ती सत्ता आपण उलथून पाडावी हे सामर्थ्य व ही आकांक्षाही त्यांच्या मनात नव्हती ! भारतात साम्राज्य स्थापण्यास ब्रिटिशांना ज्यांनी सैनिक दृष्टीने मदत केली त्यांत क्षात्रधर्माचे अनुयायी म्हणून गाजलेल्या रजपुतांचाही भरणा बराच मोठा होता. ते शूर होते, उच्चवर्णीय होते; पण, जावडेकर म्हणतात, त्या वेळच्या हिंदुसमाजात धर्मनिष्ठा, शौर्य ही गुणसंपदा भरपूर असूनही राष्ट्राभिमान मुळीच नव्हता. दक्षिणेतील मराठे सरदार व जहागीरदार यांच्या राजनिष्ठेचे पोवाडे मुंबईचा गव्हर्नर सर जॉन मालकम यानेच गाइले आहेत. त्यांनी आपल्या स्वामीशी म्हणजे पेशव्यांशी द्रोह करून ब्रिटिशांना साह्य केले म्हणून त्यांच्या जहागिरी जप्त करू नयेत, अशी मालकम विलायत सरकारकडे शिफारस करीत आहे ! खडकीच्या लढाईच्या वेळी, 'बडे साहेबास यश यावे, साहेब लोक जिवानिसी खुशाल राहावे,' म्हणून पुण्याला