पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुसमाजाचे भवितव्य
२१५
 

कालखंडांत अजिंक्य ठरलेल्या पाश्चात्य सत्तेचा निःपात करून स्वातंत्र्य मिळविण्यात ती यशस्वी झाली. भारतात ही जी अपूर्व क्रान्ती झाली तिचे विवेचन या प्रकरणाच्या प्रथमार्धात करून उत्तरार्धात त्या क्रान्तीची पूर्णता, सांगता कशी करता येईल याचा विचार करावयाचा आहे. स्वातंत्र्य प्राप्त झाल्याला आता एकोणीस-वीस वर्षे होत आली; पण आपले भारतीय प्रजासत्ताक बलशाली होण्याऐवजी उत्तरोत्तर क्षीणबलच होत चालले आहे. चीनचे आक्रमण मोडून काढून त्याने गिळलेली भारताची भूमी मुक्त करण्यात भारताला यश येत नाही. त्याचप्रमाणे काश्मीर, नागा, मिझो या समस्याही सोडविता येत नाहीत. अन्नधान्यसमस्या, चलनाच्या स्थैर्याची समस्या, पंजाबचा प्रश्न, आसामचा प्रश्न, सीमाप्रश्न, गोवाप्रश्न, काँग्रेस मंत्रिमंडळातील प्रत्येक प्रदेशातील दुही, प्रदेश- राज्यांत भडकत चाललेला वैराग्नी, संघराज्यातून फुटून निघण्याची द्रवीडकळहम्- सारखी वृत्ती यांमुळे तर दीर्घकालानंतर मिळालेले स्वातंत्र्य टिकविता येईल की नाही, अशी दारुण, दुष्ट शंका विचारी मनाला घेरीत आहे. म्हणजे पुन्हा पहिलाच प्रश्न निर्माण झाला ! भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण कसे करायचे ? अपूर्ण राहिलेली धार्मिक व राष्ट्रीय क्रान्ती पूर्ण करून हे बल प्राप्त करून व्यावयाचे, हे त्याचे उत्तर आहे. त्याचा विचार उत्तरार्धात करावयाचा आहे. प्रथम घडलेल्या क्रान्तीचे स्वरूप पाहू.
 ब्रिटिश साम्राज्यसत्तेशी लढा देऊन भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देणारी जी सर्वांगीण क्रान्ती तिचा विचार येथे करावयाचा आहे, तो अगदी संक्षेपाने करावयाचा आहे. एकतर हा विषय अगदी ताजा असा आहे. शिवाय ती क्रान्ती घडविणाऱ्या थोर पुरुषांची चरित्रे शाळा- महाशाळांतून नित्य शिकविली जातात. या विषयावरचे ग्रंथही बहुतेक भाषांतून झालेले असून त्यांतले बरेचसे सुशिक्षितांच्या वाचनात असतात. म्हणून येथे तपशिलात न शिरता विषयपूर्तीसाठी अवश्य तेवढेच विवेचन करावयाचे आहे.
 १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि येथला स्वातंत्र्याचा लढा संपला. १८९८ साली लो. टिळकांना राजद्रोहाची शिक्षा झाली. त्या वेळी या स्वातंत्र्ययुद्धाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला; पण त्याच्या आधी जवळजवळ पन्नास वर्षे राष्ट्रीयत्व, लोकशाही व विज्ञान यांचे तत्त्वज्ञान समाजात प्रसृत होत होते. म्हणजे हा स्वातंत्र्याचा लढा जवळजवळ शंभर वर्षे चालू होता असे म्हणण्यास हरकत