पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

पूर्ण यशस्वी झाले होते, अवनीमंडल निर्यवन करण्यात त्यांना बह्वंशी यश आले होते; पण याच काळात पाश्चात्त्यांचे आक्रमण या भूमीवर चालू होते. पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज या युरोपीय सत्ता सोळाव्या शतकाच्या प्रारंभापासूनच भारतावर आक्रमण करू लागल्या होत्या. या सत्तांशी मराठ्यांनी वरचेवर मुकाबला केला आणि काही युद्धांत त्यांचा पराभवही केला; पण प्रथमपासूनच असे दिसू लागले की, पाश्चात्त्य सत्तांना तोंड देण्यासाठी जे सामर्थ्य प्राप्त करून घ्यायला हवे होते त्याची उपासना कशी करावयाची, याचे आकलन भारतातल्या कोणत्याही समाजाला होत नाही; त्या सत्तांची बलस्थाने कोणती, त्यांच्या जगद्विजयाचे रहस्य काय हे जाणून घेण्याची ऐपतच येथे कोणाच्या ठायी नाही. शब्दप्रामाण्य, भौतिक ज्ञानाची अवहेलना, कूपमंडूकवृत्ती, समुद्रगमननिषेध यामुळे हिंदूंची बुद्धी अगदी लुळीपांगळी होऊन गेली होती. यामुळे पाश्चात्त्य आक्रमकांचे सामर्थ्य व त्यांच्या आक्रमणाचे स्वरूप यांविषयी त्यांना कधी उमजच पडला नाही. मराठ्यांना पडला नाही आणि शीखांच्या उत्कर्षाच्या काळी भारतातल्या काही प्रांतांत इंग्रजी विद्येचा प्रसार झाला असून त्यांनाही हा उमज पडला नाही. अर्थातच मुस्लीम आक्रमणास निर्दाळून टाकण्यात यशस्वी झालेले हे समाज इंग्रजांच्यापुढे नामोहरम झाले आणि पुन्हा एकदा भारताच्या कपाळी पारतंत्र्य आले. दुसऱ्या कालखंडाची ही कथा आहे.

तिसरा कालखंड :
 त्यानंतर १८२० पासून भारतात पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारास प्रारंभ होऊन येथल्या इतिहासाच्या तिसऱ्या कालखंडास प्रारंभ झाला. सुदैव असे की, पाश्चात्त्य विद्येच्या प्रभावाने येथल्या धुरीणांना अगदी अल्पकाळात नवी दृष्टी प्राप्त झाली. आणि राष्ट्रीयता, लोकशाही व विज्ञाननिष्ठा ही पाश्चात्त्यांच्या सामर्थ्याची रहस्ये त्यांना सहजच आकळता आली. हे नवीन ज्ञान प्राप्त होताच, या नवतत्त्वांवर आपल्या समाजाची पुनर्घटना करण्यास येथे सर्वांगीण, आमूलाग्र क्रान्ती घडविणे अवश्य आहे, हे त्यांच्या ध्यानी आले व राजा राममोहन रॉय यांच्यापासून पंडित जवाहरलाल नेहरूंपर्यंत या देशातील सर्व नेते तनमनधन खर्चून त्या उद्योगाला लागले. हा उद्योग एक शतकभर चालू होता. आणि त्याचाच परिपाक होऊन राष्ट्रीयतेच्या महातत्त्वावर भारतीय जनता संघटित होऊ शकली व मागल्या