पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे







हिंदुसमाजाचे भवितव्य


 हिंदुसमाजाच्या संघटनेचा व विघटनेचा वेदकाळापासूनचा इतिहास आपण पाहात आहो. या इतिहासाचे दोन कालखंड आतापर्यंत पाहून झाले. इ. स. १००० पर्यंतचा पहिला कालखंड होय. या कालखंडात बुद्धिनिष्ठा, प्रवृत्तिवाद, प्रयत्नवाद, स्वराज्य व स्वधर्म यांच्या अभेद इ. समाजाला उपकारक अशा धर्मतत्त्वांचा प्रभाव असल्यामुळे हिंदुसमाज संघटित व म्हणूनच बलशाली व वैभवसंपन्न होऊ शकला. या कालाच्या अखेरीस हिंदुधर्माला अत्यंत विकृत रूप आले. शब्दप्रामाण्य, विषमता, निवृत्ती, दैववाद अशी समाजघातक तत्त्वे धर्मशास्त्रज्ञांनी उपदेशिली व समाजाने ती अंगीकारिली. त्यामुळे हा समाज विघटित झाला व म्हणूनच तो स्वसंरक्षणाला असमर्थ होऊन त्याला दैन्य, दारिद्र्य, पारतंत्र्य, या नरकात दीर्घकाल पिचत राहावे लागले. इ. स. १००० ते १८५० हा तो पारतंत्र्याचा दुसरा कालखंड होय. हा काळ पारतंत्र्याचा असला तरी या तमोयुगातही येथल्या काही लोकांनी संघटित होऊन आपल्या पराक्रमाने मधून- मधून स्वातंत्र्यसूर्याचे दर्शन भारताला घडविले. रजपूत, कर्नाटकी, मराठे व शीख हे ते लोक होत. या लोकांच्या धुरीणांनी हिंदुधर्माला आलेली विकृती काही अंशी तरी नष्ट केली, काही प्रमाणात तरी धर्मक्रान्ती केली, म्हणूनच यांना मुस्लीम आक्रमणाचा निःपात करता आला. मराठे या दृष्टीने जवळजवळ