पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

चार राष्ट्रांच्या यशाच्या मर्यादा कोणत्या, त्या मर्यादा त्यांच्या सामर्थ्याला का पडल्या, मुस्लीम आक्रमण त्यांनी नष्ट केले पण पाश्चात्य आक्रमणापुढे ते पराभूत का झाले याची आपण मीमांसा केली. त्या सर्व यशापयशाच्या मीमांसेचा इत्यर्थ असा की, इ.स. १००० च्या सुमारास हिंदुधर्माला जी विकृती जडली होती ती या राष्ट्रांनी काही अंशी नष्ट केली, काही प्रमाणात धर्मक्रान्ती केली म्हणूनच त्यांना त्या प्रमाणात यश आले. पण प्रारंभीच्या नेत्यांनी रूढविलेल्या क्रांतिबीजांचा विकास पुढीलांनी न केल्यामुळे पुढे समाजाचा विकास झाला नाही. त्याची सामर्थ्ये, त्याच्या सुप्तशक्ती आविष्कृत झाल्या नाहीत आणि त्यामुळे ही सर्व राष्ट्रे पाश्चात्य आक्रमणापुढे नामोहरम झाली.
 यानंतर पुढील प्रकरणात गेल्या शतकात भारतात झालेल्या क्रान्तीचा विचार करून त्या क्रान्तीमुळे पाश्चात्य सत्तांशीही लढून भारताला पुन्हा स्वतंत्र करण्यात आपल्याला कसे यश आले त्याचे विवेचन प्रथम करावयाचे आहे. आणि नंतर स्वातंत्र्यानंतर उद्भवलेल्या समस्या सोडविण्यासाठी हिंदुसमाज संघटित, बलशाली व समर्थ कसा होईल व त्या दृष्टीने नुकत्याच प्रस्थापित झालेल्या विश्वहिंदुपरिषदेने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याचे विवेचन करून या लेखमालेचा समारोप करावयाचा आहे.

§